बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटात तो हटके भूमिकेत दिसणार आहे. पण या अगोदरही त्याने बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. बॉबीने १९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात बॉबीने केवळ रोमँटिकच नाही तर ॲक्शन हिरो म्हणूनही काम केलं होतं. चित्रपटात त्याने फाईट सीक्वेन्ससह त्याने घोडेस्वारी करत तसेच वाघाशी लढतानाही दिसला आहे. या चित्रपटात त्याची सह-कलाकार ट्विंकल खन्ना ही देखील होती. या दोघांनाही त्यावेळी सर्वोत्कृष्ट पदर्पण म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. या चित्रपटातील वाघाबरोबरच्या सीनबद्दल नुकताच त्याने खुलासा केला. (Bobby deol speaks on tiger fight sequence)
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने चित्रपटाच्या सीक्वेन्सबद्दल सांगितलं. चित्रपटाच्या सीनबद्दल सांगताना बॉबी सांगतो, “आम्ही हा सीन इटलीत शूट केला होता. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तिथे एक खासगी प्राणीसंग्रहालयतील एका प्रशिक्षित सायबेरियन वाघाला ठेवण्यात आलं आहे. त्यातील एका प्रशिक्षित वाघाबरोबर माझा हा सीन चित्रीत केला होता. चित्रीकरणापूर्वी ट्रेनरने त्या वाघाची नखं कापली होती. पण त्याच्या तोंडाला टाके घातले नव्हते. अशा परिस्थितीत या सीन शूट करणं खूप कठीण आणि माझ्यासाठी अगदी धोक्याचं होतं”.

बॉबी सीनबद्दल सांगताना म्हणाला, “या चित्रीकरणादरम्यान तिथला हँडलर माझ्या मानेवर मांसाचा तुकडा ठेवत होता. जेणेकरून वाघ माझ्यावर उडी मारेल आणि त्यानंतर मी माझ्या हातांनी त्याला थांबवेल. त्याचे पंजे बरेच जड होते. आणि जेव्हा तो दमायचा तेव्हा तो त्याचे पंजे माझ्या खांद्यावर टाकून खाली खेचायचा”.
पुढे तो हसत म्हणाला, “कुत्रा एखाद्याला चावला तरी व्यक्तीला वेदना होतात. पण सीनमध्ये तर मी त्या वाघाशी लढत होतो. त्याचं तोंड माझ्या मानेजवळ होतं पण त्या क्षणाला मी फक्त त्या शॉटचा विचार करत होतो”, असं सांगत तो सीन चित्रीत करण्यासाठी किती कठीण होता हे स्पष्ट केलं.