अरबाज खान व शूरा खान २४ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न बहीण अर्पिताच्या घराच्या टेरेसवर झाले असून यावेळी जवळचे नातेवाईक व काही मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या लग्नाचे फोटो या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. लग्नानंतर मात्र जेव्हा लोकांना शूरा व अरबाजच्या वयाची माहिती मिळाली तेव्हा दोघांच्या वयात मोठा फरक दिसला, ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत आहे. (Arbaaz Khan Break Silence)
अरबाज खानने नुकतेच पत्नी शूरा खानबरोबरच्या वयातील फरकाबद्दल भाष्य केले आहे. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’सह संवाद साधला असताना तो म्हणाला, “माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण ती १६ वर्षांची आहे असे नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवं आहे हे तिला माहीत आहे आणि मलाही आयुष्यात काय हवं आहे याची जाणीव आहे. आम्ही एकमेकांकडून काय अपेक्षा करु शकतो हे पाहण्यासाठी आम्ही एका वर्षात बराच एकत्र वेळ घालवला. आम्हाला नेमकं काय हवं आहे हे आम्हाला माहित आहे. कारण लग्नासारखे निर्णय घाईने घेतले जात नाहीत”.
अरबाज खानने वयाच्या फरकामुळे सोशल मीडियावर तो कसा ट्रोल झाला याबाबतही भाष्य केलं. तो म्हणाला, “आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती किंवा आम्ही ते एकमेकांपासून लपवून ठेवलं असं नाही. एक मुलगी म्हणून, तिला माहित होते की ती काय करत आहे, आणि एक माणूस म्हणून, मला माहित आहे की, मी काय करत आहे”.
अरबाज खान पुढे म्हणाला, “नातेसंबंध टिकवून ठेवणारा एकच घटक वय आहे का? स्व: तालाच विचारा. किंबहुना, जेव्हा जेव्हा तुम्ही विवाहांकडे पाहता, जिथे वयाचे मोठे अंतर असते, तेव्हा त्यांचा यशाचा क्रम खूप जास्त असतो”. अरबाज व शूरा या दोघांमध्ये २३ वर्षांचा फरक आहे. अरबाज खान ५६ वर्षांचा आहे. तर शूरा खान ३३ वर्षांची आहे.