बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे जन्मलेल्या अनुपम खेर यांच्या वडिलांचे नाव पुष्कर नाथ खेर होते आणि ते वन विभागात लिपिक म्हणून काम करत होते. तर अनुपम यांची आई दुलारी देवी या गृहिणी होत्या. कोणतीही नोकरी करायची नाही तर कॅमेऱ्यासमोर आपली प्रतिभा दाखवायची, याची जाणीव अनुपम यांना पहिल्यापासूनच होती. पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर, त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि ते अभिनयाकडे वळले. अनुपम यांना सिनेसृष्टीत आल्यानंतर बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागला. एकदा काम करताना ते छोट्या भूमिकेसाठी नाराज झाले तेव्हा महेश भट्ट यांनी त्यांना शिव्याशापही दिले होते. (Anupam kher On Mahesh Bhatt)
अनुपम खेर यांना चित्रपटात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अखेर महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्याची गणना बॉलिवूडच्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. अभिनेत्याने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत या चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. पडद्यावर एक जुनी भूमिका साकारायला मिळणार म्हणून अभिनयाचे वेड असलेल्या अनुपम खेर यांनी या भूमिकेसाठी आनंदाने होकार दिला. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी विविध तयारी सुरु केली. त्यादरम्यान अचानक त्यांना बातमी मिळाली की, या चित्रपटात महेश भट्ट यांनी त्याच्या जागी संजीव कुमार यांना घेतलं. हे ऐकून अनुपम खेर आतून उद्ध्वस्त झाले आणि अभिनेत्याने मुंबई सोडून त्याच्या मूळघरी परतण्याचा निर्णय घेतला.
आपल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी असेही म्हटले होते की, त्यांनी केवळ मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. तर महेश भट्ट यांच्याकडे जाऊन त्यांनी संतापही व्यक्त केला. अभिनेता थेट महेश भट्ट यांच्या घरी पोहोचला आणि त्यांना अशा काही गोष्टी बोलल्या की दिग्दर्शकाला त्यांना मध्येच गप्प करावे लागले. अनुपमने महेश यांना सांगितले की, “तू तुझ्या या चित्रपटात सत्य बोलतो आहेस, पण तुझ्या स्वतःच्या आयुष्यात सत्य असं काहीच नाही, मी ब्राह्मण आहे आणि तुला शाप देतो”, असं म्हणत असताना महेशने थांबवले. आणि मग ‘सारांश’चं शूटिंग सुरु झालं.
या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तर महेश भट्ट यांना उत्कृष्ट कथेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. जेव्हा जेव्हा कलात्मक चित्रपटांची चर्चा होते तेव्हा अनुपम खेर यांच्या या चित्रपटाचे नाव अव्वल राहते. अनुपम खेर यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल’, ‘सौदागर’, ‘हम आपके है कौन’, ‘तेजाब’, ‘राम लखन’ यांसारखे ५०० हून अधिक चित्रपट केले आहेत.