‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेता पुष्कर जोगने बीएमसी कर्मचारी व सर्वे प्रकरणावरुन केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पुष्कर जोगचा यासंदर्भात जाहीर निषेध केला आहे. मुख्यमंत्री व महापालिका आयुक्त यांना पत्र लिहित अभिनेत्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून अभिनेत्याने माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. (Pushkar Jog On Cast)
पुष्करने शेअर केलेल्या पोस्टचा निषेध करत त्यांनी असे म्हटले आहे की, “जाहीर निषेध! कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्याबद्दल पुष्कर जोग यांचा जाहीर निषेध! श्री.जोग यांनी महापालिका कर्मचाऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अन्यथा आंदोलन अटळ! या बाबत उचित कारवाई करण्याची मान. मुख्यमंत्री आणि मान.महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे विनंती. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है.” असं त्यानी म्हटलं असल्याचं समोर आलं आहे.
जातीसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत पुष्करने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर केली होती. ही स्टोरी पोस्ट करत त्याने, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील” असं म्हणत त्याने #जोगबोलणार हा हॅशटॅग वापरला होता.
बीएमसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला हा संतप्त मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता पुष्कर जोग माफी मारणार की नाही, की हा मुद्दा वाढवणार हे पाहणं रंजक ठरेल.