Suraj Chavan Movie Look : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाने विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव पटकावले. यंदाच्या या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता होताच कलर्स मराठीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेने साऱ्यांचेच लक्ष वेधले. सूरज केदार शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं. अखेर केदार शिंदेंच्या म्हणण्याप्रमाणे सूरज चव्हाण अभिनीत नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. ‘झापूक झुपूक’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
या चित्रपटात सूरज चव्हाण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर व सूरजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. याशिवाय चित्रपट प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. २५ एप्रिल पासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यावेळी चित्रपटातील सूरजचा लूक समोर आला आहे. सूरजच्या लूकचं सर्वत्र भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सूरजने आजवर त्याच्या स्वभावाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता अभिनयातून सूरज प्रेक्षकांची मन जिंकायला सज्ज होत आहे.
समोर आलेल्या चित्रपटाची पोस्टरमध्ये सूरजने धोतर नेसले आहे आणि त्यावर कुर्ता घातला आहे. आणि त्यावर कोट परिधान केला आहे. हातात अंगठ्या, मनगटावर घड्याळ, गळ्यात सोन्याची चैन, गॉगल अशा लूकमध्ये सूरज चव्हाण दिसत आहे. त्याच्या शेजारी दोन डॉल्बी पाहायला मिळत आहेत. तसेच पार्श्वसंगीतमध्ये ‘झापुक झुपूक’ असे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिओ स्टुडिओने, “करुया श्रीगणेशा, माघी गणपतीच्या मुहूर्तावर. बाप्पाच्या आशीर्वादाने येत आहे. तुमच्यातलाच माणूस, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून, ‘झापुक झुपूक’”, असं म्हटलं आहे.
‘झापूक झुपूक’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर निर्मिती ज्योती देशपांडे व बेला केदार शिंदे यांनी केले आहे. सूरज चव्हाणबरोबरच या चित्रपटात मिलिंद गवळी, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत. सूरज चव्हाणच्या या पोस्टमध्ये या कलाकारांनादेखील टॅग केले आहे. सूरजच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.