Bigg Boss Ott 2 Winner : ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या इतिहासात नाव कोरावं अशी घटना घडली आहे. आजवर वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेला स्पर्धक विजेता झालेला पाहायला मिळाला नव्हता. मात्र ‘बिग बॉस ओटीटी’चं यंदाचं पर्व ऐतिहासिक ठरलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादव या स्पर्धकाने बाजी मारली असून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
‘बिग बॉस ओटीटी’च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे यांना पाहणं रंजक ठरलं. त्यानंतर अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये मतांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर एल्विशने विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
पाहा विजेता झाल्यावर एल्विशने काय प्रतिक्रिया दिली (Bigg Boss Ott 2 Winner)
एल्विशने इंस्टग्राम पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे, या पोस्टमध्ये एल्विशने लिहिले आहे की, “एल्विश आर्मी तुमचे मनापासून धन्यवाद. हा तुमचा विजय आहे. तो सुरुवातीपासून तुमचाच होता. एल्विश यादव तुम्हा सर्वांशिवाय काहीच नाही. मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही भरभरुन देत असलेल्या प्रेमासाठी मी खरंतर पात्र नाही, पण तुम्ही मला ते अधिकाधिक देत आहात. यासाठी मी तुमचे आभार शब्दात मांडू शकत नाही”.
यापुढे म्हणत एल्विशने म्हटलं आहे की, “बघा तुमच्या याच प्रेमाखातर मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी एल्विश आर्मीची आहे. हे सर्व काही तुमचं आहे. मी पण तुमचाच आहे. तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत. फक्त हे लक्षात ठेवा तुमच्यामुळेच मी आहे. सिस्टम हँग केलं ना..”.
एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ८ आठवड्यांच्या खेळात चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती. अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या लढाईत एल्विशने बाजी मारली.