Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवीन म्हणजेच यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत आहे. या शोमध्ये यावेळी खूप नवनवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ हा २०२४ चा आहे, त्यामुळे घरातील स्पर्धकही नव्या दमाचे घेतले असं कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा नेत्या, अभिनेत्यांपासून गायक व सोशल मीडिया इन्फ्ल्युसर्स अशा प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धकांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सूरज, अंकिता, डीपी या सोशल मीडिया इन्फ्ल्युसर्सनी सहभाग घेतला आहे, तर निक्की, जान्हवी, पॅडी व वर्षा यांसारखे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाले आहेत.(Kedar Shinde On Suraj Chavan)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सुरुवात होऊन आता जवळपास पन्नास दिवस झाले आहेत. त्यामुळे या घरातील स्पर्धकांमध्ये आता चुरुशीची लढत पाहायला मिळत आहे. या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये आनंदी भावना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहते मंडळींसह प्रेक्षकांनाही तो या शोचा विजेता व्हावा अशी इच्छा आहे. अनेकजण तो हा शो जिंकावा अशा प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’चे काम जवळून पाहणारे व कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनीदेखील तो टॉप ५ मध्ये येईल असं म्हटलं आहे.
केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअपमध्ये मुलाखत दिली. यावेळी केदार शिंदे यांना “टॉप ५ मध्ये कोण येईल?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत केदार शिंदे यांनी असं म्हटलं की, “मला नाही माहिती. या प्रश्नाचे उत्तर देणं फार कठीण आहे. कारण दर आठवड्याला गेम ज्या पद्धतीने फिरत आहे. त्या पद्धतीने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे आणि ‘बिग बॉस’च्या घराबाहेरील प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. या घरातील प्रत्येकजण हा जिंकायलाच आला आहे. त्यामुळे कुणीही शस्त्र टाकून घरी येणार नाही. प्रत्येक जण लढेल. पण आता शेवटी टॉप ५ मध्ये कोण येईल हे मलाही माहित नाही”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “जनतेचा रेटा जो दिसत आहे, त्यानुसार सूरज शेवटच्या टॉप ५ मध्ये असेल असं मला वाटत आहे. जे काय वोट्स येत आहेत ते जगजाहीर आहे. त्याबद्दल सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सूरज असायला पाहिजे”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने अनेकदा केलेल्या साध्या सोप्या कृतीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुरुवातीलाअ त्याला बिग बॉसचा गेम कळत नव्हता पण आता त्याला हा खेळ कळायला लागला असून प्रत्येक टास्कमध्ये तो आपला जीव लावून खेळत आहे.