Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वामधील एक स्पर्धक सध्या चांगलाच जोमात येत आहे. घरासह घराबाहेरील अनेक प्रेक्षकांकडून या स्पर्धकांचं कौतुक होत आहे आणि हा कलाकार म्हणजे सूरज चव्हाण. त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरुवातीला त्याला या घरात त्याला त्याचा जम बसवणे अवघड झालं होतं. मात ‘बिग बॉस’ने त्याला आत्मविश्वास दिल्यानंतर त्याने आपला खेळ सुरु केला आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. याचबरोबर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळीही त्यांच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Update)
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाबद्दल किरण माने, पुष्कर जोग, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कालकार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कलाकारांपैकी आणखी एक कलाकार पहिल्या दिवसापासून सूरजला पाठींबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजबद्दल त्याच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच नुकत्याच प्रोमोमध्ये सूरज घरात झाडू मारताना पाहायला मिळत आहे. कॅप्टन अंकिता वालावलकरने स्पर्धकांना दिलेल्या ड्युटी नुसार सूरजच्या वाटेला बाहेरच्या आवारातील केर काढण्याचं काम येतं.
या प्रोमोवरही उत्कर्षने त्याच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने या व्हिडीओखाली कमेंट करत असं म्हटलं आहे की, “ही ड्यूटी नको ती ड्यूटी नकों कधी बोलला, नाही. शिक्षण नसुनही कधी भाषेत माज किंवा दुसऱ्यांचा अपमान दिसला? नाही. कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? नाही. कोणत्या मुलीचा अपमान केला? नाही. खेळात टिकण्यासाठी खोटं प्रेमाच नाटक, रडणं, रुसणं, फुगणं असलं काही केलं का?, नाही. एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार आणि दिसणार.”

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात सूरजचा खेळ पाहून प्रेक्षकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीच कशाला तर घरातील स्पर्धकांनीही त्याला इथे का आणलं आहे, असा सवाल केला. या शोमध्ये येऊन तो काय करणार?, तो चुकीच्या शोमध्ये आला आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. मात्र सूरजला ‘बिग बॉस’ने पाठिंबा दर्शवल्यानंतर सूरजमध्ये झालेला बदल पाहून त्याला आता सबंध महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.