Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. यंदाच्या पर्वाच्या या विजेतेपदावर गोलीगत फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने ट्रॉफी मिळवली. सूरजच्या भन्नाट लोकप्रियतेमुळे तो यंदाच्या पर्वाचा विजयी ठरला. लाखोंची रक्कम, दुचाकी गाडी, डायमंड ज्वेलरी मिळवत सूरजने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी घेत घराबाहेर एक्झिट घेतली. मात्र सूरजचा या घरातील प्रवास काही सोप्पा नव्हता. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाणचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली. सूरजचे टिक टॉकवरील व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळायला लागली.
मात्र कोरोना काळात टिकटॉक बंद पडले आणि त्याने आपला मोर्चा युट्यूबकडे वळवला. तसेच त्याने मराठी चित्रपटातूनही काम केलं आहे. ‘का रं देवा’ या चित्रपटाद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकला आहे. सूरजची परिस्थिती खूप वाईट होती. त्याच्या पप्पांना कॅन्सर झाला होता आणि त्याची गाठ शरीरात उतरली आणि त्यात त्याचे वडील गेले. वडिलांच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या आईला वेड लागलं. सतत विचार करुन आणि टेंशन घेतल्याने तिला वेड लागलं. तसेच रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. सतत वडिलांचा विचार करत ती खचून गेली. एकीकडे सूरजच्या आजीने जीव सोडला आणि एकीकडे त्याच्या आईने. त्यांनी एकमेकींची तोंडंही बघितली नाहीत. महादेवांना पप्पा आणि आई मरीमातेला आई मानणाऱ्या या सूरजने लहानपणीच आई-वडील गमावले तरी त्याने आई मरी मातेच्या मंदिरात येणाऱ्या खोबऱ्याच्या नैवेद्यावर त्याने दिवस काढले.
सूरजला आजोबाही नाही. आजीही नाही. आई-वडीलही नाही. फक्त आत्या आणि पाच बहिणी आहेत. एकूण आठ बहिणी होत्या. त्यापैकी काही वारल्या. त्यामुळे तो आठवा कृष्णा आहे. टिकटॉकवेळी सूरजला दिवसाला रिबिन कापायला८०,००० हजार रुपये मिळायचे. त्यावेळी एक दिवसाचे मानधन ८०,००० तो घ्यायचा. आतापण तो एका दिवसाचे ३० ते ५० हजार घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी त्याला खूप लूटलं. आता सूरज हा कठीण प्रवास करत ‘बिग बॉस मराठी’चा विजेता ठरला.