Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त लोकप्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला आणि सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Winner)
उत्कर्षने काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात सूरजसाठी एक गाणं करणार असल्याचे म्हटलं होतं आणि उत्कर्षने त्याचा शब्द पाळला आहे. उत्कर्षने सूरज विजयी होताच त्याच्यावर जबरदस्त गाणं केलं आणि ते संगीतबद्धही केलं. ‘बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ असं या जबरदस्त गाण्याच्या ओळी आहेत. याचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने सूरजच्या विजयावर नाराजी व्यक्त करण्याबद्दल मार्मिक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आयुष्य जगून समजते. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरज ने काय वेगळं केल घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं. आणि जिंकला त्यांना मला हेच सांगायचं आहे. घरात आपुलकी , मानसन्मान , कोणाचा निरादर नाही, कोणाची कधी कसलीच भीती नाही तर कोणासमोर माज, गर्व नाही. किंवा कोणासाठी मनात क्लेषही नाही. जे होतं ते स्वच्छ निर्मळ सरळ… खोटं नाट नाहीच. एकाग्र संयमी कासव उड्या मारणाऱ्या सश्यांना जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १००% मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला”.
यापुढे उत्कर्षने असं म्हटलं आहे की, “जसाच सूरज जिंकला हे कळाल इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाण लिहलं रचला बनवल संगीतबध केलं गायल आणि लगेच आल्हाद बरोबर वीडियो शूट केलं .१ तासात गाण तयार.. सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला. लवकरच महागायक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात मी सूरजच गाण घेऊन येतोच आहे. सूरज मित्रा तू लवकर फ्री हो, अख्या महाराष्ट्राला खूप नाचायचं आणि नाचवायचं आहे. बाकी सूरज जिंकला म्हणून ज्यांना कुठे जळत असेल त्यांनी बर्नोल क्रीम ओईंटमेंट लावावे. वाटल्यास त्याचे पैसे मी देईन”.