Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सध्या सुरु असून या पर्वात स्पर्धकांनी घातलेला धुमाकूळ साऱ्यांनाच पाहणं लक्षवेधी ठरत आहे. यंदाच्या या नव्या पर्वात आलेल्या स्पर्धकांचे वागणं, बोलणं अनेकांना खटकताना दिसत आहे. यावरुन सोशल मीडियावर अनेक जण आपापले मत व्यक्त करताना दिसतात. नुकताच जान्हवीने केलेला पॅडी कांबळे यांचा अपमान हा अनेकांना खटकला तर निक्कीनेही कांबळेला जोकर असं म्हटलं. इतकंच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीत कार्यरत असणाऱ्या जान्हवी किल्लेकरने मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज विनोदी कलाकाराचा अपमान केला. त्याच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवरुन टिप्पणी केली आणि ही टिप्पणी अतिशय चुकीची असल्याचं अनेकांनी मत मांडलेलं पाहायला मिळालं.
कलाकार मंडळी, प्रेक्षक मंडळी यांच्यासह आता पॅडी कांबळेच्या लेकीने म्हणजेच ग्रीष्माने सुद्धा बाबांची बाजू घेत यावर भाष्य केलेलं पाहायला मिळालं. ग्रीष्माने बाबांच्या करिअरवर बोलण्याआधी स्वतःचे सिनेसृष्टीतील करिअर तपासून पहावं असं भाष्य केलेलं दिसलं. ग्रीष्माने इंस्टाग्राम अकाउंटवरुन केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. या पोस्ट खाली अनेकांनी ग्रीष्माला व पॅडी कांबळेला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. सदर पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत ग्रीष्माचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. एक मुलगी म्हणून वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ग्रीष्माचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.
या पोस्टखाली अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी कमेंट करत असे म्हटले आहे की, “हर घर ऐसी बेटी भेजो भगवान. शाब्बास पोरी”. तर “खूप खूप प्रेम तुला ग्रीष्मा. मी समजू शकतो आपला माणूस आत असेल आणि असं काही घडत असेल तेव्हा बाहेरुन बघणं किती त्रासदायक असतं. अशीच बाबाबरोबर खंबीर उभी रहा. बाबा ट्रॉफी घेऊन येतोच आहे”, असं सौरभ चौघुलेने कमेंट करत म्हटलं आहे. तर नम्रता रुद्राजने “प्रेम आदर द्विगुणित झाला बाळा”, असं म्हणत ग्रीष्माच कौतुक केलं आहे.
तर प्रसाद खांडेकरने “बच्चा खूप प्रेम तुला व दादाला”, असं म्हटलं आहे. याशिवाय मुग्धा गोडबोले, स्वानंदी बेर्डे या कलाकारांनी ग्रीष्माच्या पोस्टखाली कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. आणि तिला पाठिंबा दर्शविला आहे.