Bigg Boss Marathi 5 : बिनधास्त, रोखठोक न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात सिनेविश्वातील बरीच कलाकार मंडळी अग्रेसर असलेली पाहायला मिळतात. बरेचदा ही मंडळी सोशल मीडियावरुन व्यक्त होतात. अशातच या कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाईल ते म्हणजेच मेघा धाडे. ‘बिग बॉस मराठी’ सीजन १ ची विजेती मेघा धाडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. बरेचदा ट्रोलर्सच्या कमेंटवर ती सडेतोडपणे भाष्य करत ट्रोलर्सला उत्तरही देताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये मेघा धाडेने उत्तम कामगिरी करत त्या पर्वाची ट्रॉफी कमावली. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली ही पोस्ट ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ वर भाष्य करणारी आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दोन गट पडलेले दिसत आहेत. दरम्यान कालच्या भागात जान्हवी व वर्षा उसगांवकर यांच्यात अगदी टोकाचं भांडण झालं. जान्हवीने यावेळी वर्षा यांचा केलेलं अपमान पाहून संबंध महाराष्ट्र पेटून उठला आहे.
“ही फाल्तूची ओव्हरअॅक्टिंग नका करु. ज्यांनी पुरस्कार दिला त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत पण, तुम्हाला दिला”, अशा शब्दात अपमान करताच मेघा धाडे हिने खरमरीत पोस्ट लिहीत जान्हवीला टोला लगावला आहे. मेघाने पोस्ट शेअर करत, “माझ्या लाडक्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका. तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही माझी कळकळीची विनंती आहे. ‘बिग बॉस मराठी’ची सर्वांत वाईट स्पर्धक जान्हवी किल्लेकर”, असं म्हणत तिच्यावरील राग व्यक्त केला आहे.

तर आणखी एक पोस्ट शेअर करत तिने, “मला अजूनही आठवतंय की, हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा व स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला. काही स्पर्धकांप्रती जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या. आम्हाला असे लोक घरात नको आहेत. ही माझी कळकळीची विनंती आहे”, असंही म्हटलं आहे.
पुरस्कारावरुन झालेल्या अपमानावर मेघाने पोस्ट लिहीत, “महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार यावर या पद्धतीच्या भाषेचा वापर झालेला आहे. त्याबाबत आज मान लाजेने खाली गेली. वर्षा ताई यांना फक्त अपमानाची होण्याकरिता या शोमध्ये आणले आहे असे वाटत आहे. हेच पुरस्कार मिळवण्यासाठी कित्येकांची हयात जाते. ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, महेश कोठारे, प्रिया बेर्डे यांची व्यक्त केलेली नाराजी मनाला अजून चटका देणारी आहे. प्रशांत दामले, मोहन जोशी सर आपल्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून गेले”, असे म्हटलं आहे.