‘बिग बॉस मराठी’च्या सीजन ५ मधून पहिला स्पर्धक घराबाहेर पडला तो म्हणजेच कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. पुरुषोत्तम दादा पाटील यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास हा पहिल्याच आठवड्यात संपला आणि त्यांना घराबाहेर पडावं लागलं. मात्र त्यामुळे त्यांचा तितकाचा खेळ पाहायला मिळाला नाही, असं असलं तरी अगदी घरातून निघताना शेवटच्या क्षणाला त्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संतांचा जयजयकार पाहून त्यांनी अनेकांची मन जिंकली. सोशल मीडियावरुन त्यांच्या या कृतीच बरंच कौतुकही करण्यात आलं. पुरुषोत्तम दादा पाटील सध्या घराबाहेर पडले असून त्यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील सर्व स्पर्धकांच्या स्वभावाबाबत भाष्य केलं. (Purushottam Dada Patil On Suraj Chavan)
पुरुषोत्तम दादा पाटील यांना जेव्हा सूरज चव्हाणबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की, सूरजबद्दल किती बोलावं हे कमीच. मी त्याच्याबद्दल एक तासही सलग बोलू शकतो कारण तो खूप निर्मळ मनाचा आणि साधा भोळा आहे. त्याच्या मनात कोणतंच कपट नाही. सूरजला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर सूरजच्या नावाची बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. ‘बिग बॉस’मुळे सूरज चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र सूरजला पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी देखील ‘बिग बॉस’च्या घरात त्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून सूरजचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला.
‘रेडिओ सिटी मराठी’ या वाहिनीला मुलाखत देतानाच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सुरज बद्दल असं भाष्य केलं की, “संपूर्ण महाराष्ट्र सूरजवर प्रेम करत आहे. सूरज खूप निर्मळ मनाचा मुलगा आहे. मी स्वतः त्याला अनुभवलं आहे. मराठमोळ्या मातीशी नाळ असलेला आणि मनाने तो भावुक आहे. त्याच्या मनात कोणाबाबद्दल कपट नाही आहे. थोडाफार तो चिडलेला दिसतो पण ते थोड्यापुरतं आहे. आम्ही सर्वच सदस्य आयुष्याच्या एका एका टप्प्यावर आलो आहोत पण सूरजची ही सुरुवात आहे. आणि महाराष्ट्राने त्याला या त्याच्या प्रवासात उत्तम साथ दिली आहे. महादेवांना तो पप्पा म्हणतो. त्याला आई-वडील नाही आहेत. महादेव पप्पा तर मरीमाता ही त्याची कुलदैवत आहे ती त्याची आई आहे”.
पुढे ते म्हणाले, “त्याच्याविषयी मी तासभरही बोलू शकतो. तो सगळ्यांचं मन राखतो. घरामधील प्रत्येक ड्युटी तो प्रामाणिकपणे करतो. तो मला म्हणतो, दादा मला तुम्ही लग्नासाठी मुलगी पाहाल ना?. यावर मी त्याला पाहतो असं म्हटलं. तेव्हा तो म्हणाला, मला आई नाही तर तिला सासूचा जाच होणार नाही. तर वडील नाही तर सासऱ्यांचा जाच होणार नाही. तिने मला सांभाळावं आणि माझं युट्युब, इन्स्टाग्राम पाहावं. इतका तो गोड आहे”, असं म्हणत त्याच खूप कौतुक केलं.