Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा चर्चेत असणाऱ्या रिऍलिटी शोपैकी एक शो आहे. यंदा ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाने अधिक रंगत आणलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रील स्टार, गायक, रॅपर, नेते मंडळी अशा विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींनी सहभाग घेतला. यंदाच्या या नव्या पर्वाचा अगदी शेवट आला आहे. हे पर्व आता १०० दिवसांहून अवघ्या ७० दिवसांवर आलं असल्याचं समोर आलं आहे. या पर्वाचा फिनाले वीक सुरु असून या फिनाले वीकमध्ये अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर ही स्पर्धक मंडळी सहभागी झाली आहेत.
शेवटचा आठवडा सुरु झाला असला तरी स्पर्धक मंडळी भांडण करणं काही सोडत नाहीत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, टीम बी मधील अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत यांच्यात वाद झाला असल्याचं पाहायला मिळालं. अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता व अभिजीत एकत्र खेळताना दिसले. त्यांच्यात चांगली मैत्रीही पाहायला मिळाली. अनेकदा वाद होऊनही ते एकत्र दिसले. मात्र काही दिवसांपासून अभिजीत हा टीम बी पासून दूर राहताना दिसला. दरम्यान अभिजीत निक्कीबरोबर वेळ घालवताना दिसला. यावेळी अभिजीतची निक्कीबरोबरची मैत्री साऱ्यांना खटकली.
हा प्रोमो पाहून आता नेटकऱ्यांनी अभिजीतला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अंकिताची बाजू घेत अभिजीतला धारेवर धरलं आहे. “अभिजीत डबल ढोलकी आहे”, “अभिजीत सावंत निक्कीच्या ताटाखालचे मांजर आहे”, “अंकिता एक खरी मुलगी आहे. नेहमी खरं बोलत आली आहे. अभिजित खरंच डबल ढोलकी आहे”, “अभिजीत निक्कीला घाबरतो”, “निक्कीचा दुसरा माकड”, “निक्कीचा बैल झाला आहे अभिजीत सावंत”, “निक्कीचं नवं पायपुसणं. अगोदर अरबाज होता आणि आता हा अभिजीत”, अशा अनेक कमेंट करत अभिजीतला ट्रोल केलं आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता व अभिजीत यांच्यात ड्युटीवरुन भांडण झालेलं पाहायला मिळालं. अंकिता अभिजीतला म्हणते, “हिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरुमची जबाबदारी तू स्वतःवर घेत आहेस?”. यावर अभिजीत अंकिताला म्हणतो, “तुला जर वाटत असेल तर तू तिला बोल”. यावर अंकिता म्हणते, “सगळीकडे तू gentlemen म्हणून येतोस आता इथे पण ये”. यावर अभिजीत म्हणतो, “मी माझ्या ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो. त्यात माझी काय चूक आहे?”. यावर अंकिताचा पारा चढतो, तर डीपीही अभिजीतवर भडकतो, आणि “तू कोणाला सांगतोयस?”, असं अभिजीतला विचारतो.