Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ मराठीच्या सहावा सिझन खूपच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस’चा नवीन प्रोमो समोर आला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलते यांचा रोमँटिक डान्स दाखवण्यात आला आहे. दोघांमधील केमिस्ट्री पाहून घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकही थोडे चकित झाले. डान्सच्या दरम्यान राकेशने तन्वीच्या गालावर किस केल्याचं दिसतं. ज्यामुळे ‘बिग बॉस’ च्या घरात वातावरण अधिकच तापलेलं दिसत आहे.
राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखी सावंत लगेचच तन्वीला प्रश्न विचारते “हा नक्की कुठला डान्स आहे?” त्यावर तन्वी शांतपणे, “त्यालाच विचार ना,” असं उत्तर देते. डान्स सुरू असताना राखी डोळे मिटून उभी असल्याचंही प्रोमोमध्ये दिसतं. पण हे इथेच थांबत नाही. डान्स संपल्यानंतर राकेश पुन्हा एकदा राखीसमोरच तन्वीला किस करतो आणि हसताना दिसतो. यामुळे राखीचा संयम सुटतो. ती संतापून “आता परिणाम बघ” असा इशारा देते. त्यानंतर राखी हातात कात्री घेते आणि आरशासमोर उभी राहून स्वतःचे केस कापू लागते. “मी स्वतःलाच शिक्षा देतेय… मला कोणी हर्ट करू शकत नाही, फक्त मीच मला हर्ट करू शकते,” असं म्हणत ती भावुक होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसतात. (Bigg Boss Marathi 6)
आणखी वाचा – विजय देवरकोंडा इंस्टाग्रामवर बायकोला करत नाही फॉलो, लग्नानंतर सुरु झाल्या चर्चा, मात्र रश्मिका…
हा प्रकार पाहून घरातील सदस्य धाव घेतात. तन्वी, दिपाली आणि इतर सदस्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. राकेशलाही या कृतीचा मोठा धक्का बसल्याचं दिसतं. तो काही क्षणभर स्तब्ध उभा राहतो. या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. राकेश-तन्वीच्या जवळकीमुळे राखीची ही प्रतिक्रिया किती पुढे जाईल? घरात नवं वादळ उठणार का? येत्या भागात या तिघांमधील समीकरण कसं बदलणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर मात्र प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण याला गेमस्ट्रॅटेजी म्हणत आहेत, तर काहींना राखीची प्रतिक्रिया खरी वाटत आहे. आता पुढील भागात नेमकं काय घडतं?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 6)





