छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शोचा रविवारी थाटात ग्रँड प्रीमियर पार पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ करणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाणच्या एण्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेला सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चला तर मग जाणून घेऊया सुरज चव्हाणबद्दल…
बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाणचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली. अशातच एकेदिवशी त्याला टिक टॉक या सोशल मीडिया अॅपबद्दल माहिती झाली.
आणखी वाचा – पॅडीकडून वर्षा उसगांवकरांची मस्करी, ब्रश करायलाही घरात पाणी नसल्याने हैराण, म्हणाल्या, “तुला नॉमिनेट करेन”
बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉक या अॅपची ओळख करुन दिली आणि त्याने बहीणीबरोबर एक व्हिडीओ शेअर केला, जो तुफान व्हायरल झाला आणि हळहळू गांवखेड्यात त्याला प्रसिद्धी मिळू लागली. पुढे त्याने स्वत:च्या कमाईने एक मोबईल विकत घेतला आणि त्यावर तो रोज व्हिडीओ बनवून अपलोड करु लागला. सुरज हा लहानपणापासूनच बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र हेच व्यंग त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.
सूरजचे टिक टॉकवरील व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळायला लागली. मात्र कोरोंना काळात टिकटॉक बंद पडले आणि त्याने आपला मोर्चा युट्यूबकडे वळवला. तसेच त्याने मराठी चित्रपटातूनही काम केलं आहे. ‘का रं देवा’ या चित्रपटाद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकला आहे. सुरज चव्हाणचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग हा खूपच मोठा आहे, इन्स्टाग्रामवर त्याचे नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अतरंगी डान्स व्हिडीओ शेअर करणारा सुरज आता बिग बॉसच्या घरात काय जादू करणार, या घरातील सदस्यांना त्याचा काही त्रास होणार का? की तोच सर्वांना त्रास देणार? या घरात त्याचा कितपत निभाव लागणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.