‘बिग बॉस’च्या घरात १६ स्पर्धकांनी राडा घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या पर्वात रील स्टार यांची कमाल पाहायला मिळत आहे. रील स्टारला ‘बिग बॉस’ने खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदा सुप्रसिद्ध रील स्टार कोकण हार्टेड गर्लची एण्ट्री पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे. अंकिताच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. (Ankita Walavalkar Lifestyle)
अंकिता ही मूळची सिंधुदुर्ग येथील आहे. अंकिताने सिविल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण MITM कॉलेजमधून पूर्ण केले आहे. कोकण हार्टेड गर्लचे मालवण येथे स्वतःचे रिसॉर्ट आहे. अंकिताने सुरुवातीला टिकटॉक पासून तिचा प्रवास सुरु केला. पण थोड्याच दिवसात टिकटॉक बंद केले. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. अंकिता सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहुणी म्हणून तर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच रील स्टार म्हणून अंकिताचा सुरु झालेला हा प्रवास साऱ्यांनी पाहिला आहे.
कोकणी भाषेत गाऱ्हाणे घालत तिने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास सुरु केला. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. काहींनी अंकिताला तिच्या या एण्ट्रीनंतर तिला सपोर्ट केला तर काहींनी तिला ट्रोलही केलं. कलाकार मंडळीही अंकिताला सपोर्ट करताना दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अंकिताने आजवर कोकणी भाषेतून व्हिडीओ बनवत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अंकिता एक उत्तम रील स्टार असून अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासाठी तिला बोलावण्यात येते.
‘जोश टॉक मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिच्या पहिल्या प्रेमाबाबतचा खुलासाही केला होता. यावेळी ती म्हणाली, “आई-वडिलांनी माझ्यासाठी काहीचं केलं नाही म्हणून मी घर सोडून आले. इंजिनिअरिंग करत असताना मी प्रेमात पडले. प्रेमात पडणं चुकीचं नाही तर कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो हे महत्त्वाचं असतं. तेव्हा मी १६ वर्षांची होते. १८ व्या वर्षी कायद्याने स्वतःचे निर्णय घ्यायची सवलत दिली म्हणून मी निर्णय घेतला. हा चुकीचा समज घेऊन मी वागू लागले. ज्या मुलाच्या मी प्रेमात पडले तो माझ्याहून ११,१२ वर्षांनी मोठा होता. घरातील शिस्तप्रिय वातावरणामुळे मी कंटाळले होते. त्यावेळी त्या मुलाने मला सपोर्ट केला मला फिरायला नेलं. यामुळे आई-बाबांबद्दल द्वेष माझ्या मनात निर्माण झाला. आमच्या नात्यातही खूप बंधने होती. त्यावेळी घरच्यांपासून सुटका व सुखसोयींसाठी मी त्याच्या घरी निघून गेले. त्यावेळी माझ्या भावाच्या गर्लफ्रेंडने मी लग्न केल्याचं सांगितलं. त्याच्या आईचा मला पूर्ण पाठिंबा होता. मी त्या मुलाबरोबर राहताना त्याचा मार खात होते, शिव्या ऐकत होते. हे सगळं सहन करताना माझी लायकी काय असेल हे तो सतत सांगायचा. त्यानंतर हे सर्व अति झालं आणि माझा विस्फोट झाला. आणि मी माझ्या घरी जायचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला खूप पाठिंबा दिला”.
अंकिता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर लग्नही करणार असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. अंकिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने प्रेमाची कबुली दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिताचा हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. साऱ्यांच्या नजरा आता अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याकडे लागून राहिल्या आहेत.