मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रेक्षकांचा भरभरुन मनोरंजन करणं हे प्रत्येक कलाकाराच्या रक्तात असतं. विविध माध्यमांमधून काम करत असताना कलाकार त्यांच्या मानधनाचाही विचार करतात. पुरेसं मानधन हाती आलं की, समाधानाची भावना मनात निर्माण होते. कामाबरोबरच निवांत राहण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारालाही पुरेशा मानधनाची गरज असते. त्यामधून आयुष्यातील पुढील स्वप्न तो पाहतो. आपलं हक्काचं घर असावं हे कलाकाराच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं स्वप्न. असंच एक स्वप्न सुप्रसिद्ध अभिनेता पूर्ण करण्यासाठी निघाला आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर त्याचा स्वप्नातील बंगला उभारत आहे. (Abhijit Kelkar new home)
अभिजीतने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टीव्हीवरील सुप्रसिद्ध चेहऱ्यांपैकी त्याचं नावही आवर्जुन घेतलं जातं. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतल्यानंतर तर अभिजीतच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. त्याची खरी बाजू प्रेक्षकांसमोर आली. सध्या तो नाटकामध्ये रमला आहे. ‘आज्जी बाई जोरात’ नाटकामध्ये अभिजीत काम करतोय. अशातच दुसरीकडे तो पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत आहे.
अभिजीत त्याच्या स्वप्नातील बंगला उभारत आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याच्या घराचं बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. अभिजीत हे बांधकाम उभं राहून पाहत आहे. बांधकाम पाहता अगदी मोठं घर उभं राहणार असल्याचं चित्र दिसतंय. अभिजीतने व्हिडीओ शेअर करत त्याला सुंदर कॅप्नशही दिलं. अभिजीत म्हणाला, “स्वप्नांचा पाठलाग करा”.
आणखी वाचा – सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्…; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष
डोळ्यासमोर स्वप्न पूर्ण होत आहे हे पाहून अभिजीतही भारावून गेला आहे. व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भविष्यातील स्वप्न डोळ्यांमध्ये दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही अभिजीतला अभिनंदन केलं. अभिजीत अलिबागमधील किहीममध्ये हे घर बांधत आहे. सुकन्या मोनेंनी कमेंट करत याबाबत विचारलं असता त्याने माहिती दिली. अभिजीतच्या आयुष्यातील हे महत्त्वाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल.





