इंडस्ट्रीमध्ये जो शेवटपर्यंत टिकून राहिला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, असं कित्येक कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळालं. मात्र या क्षेत्रात कोणीच गॉडफादर नसताना नाव कमावणं अधिकच अवघड होऊन जातं. मेहनतीच्या जोरावर तुम्ही जग जिंकू शकता. तसंच कलाक्षेत्रातही तुम्ही मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकता हेही तितकंच खरं आहे. गायक अभिजीत सावंतलाही याची प्रचिती आली. ‘इंडियन आयडल’ शोने अभिजीतचं पूर्ण आयुष्यच बदललं. हिंदीत तो सातत्याने काम करत राहिला. पण मराठी असून मराठी इंडस्ट्रीमध्ये तो कुठेच दिसला नाही. याचबाबत अभिजीतने आता भाष्य केलं आहे. (abhijeet sawant on Marathi industry)
मराठी इंडस्ट्रीने आपलंस कधीच केलं नसल्याचं अभिजीतने म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, “मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. एक अनोखळी व्यक्ती असल्यासारखी वागणूक मला मराठीमध्ये मिळाली. मी मराठी नसल्यासारखंच मला वागवलं गेलं. यामुळे मी खूप दुखावलो गेलो”.
“मराठी प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. हा आमचा मराठी मुलगा आहे म्हणत त्यांनी मला स्वीकारलं. मराठी इंडस्ट्रीकडून मला हे कधीच जाणवलं नाही. कधीच मला तसं वागवण्यात आलं नाही. ‘बिग बॉस मराठी’मुळे मला मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. हा प्रयत्न माझा यशस्वी ठरला. आजही मला मराठी इंडस्ट्रीमधील लोक विचारतात की, अरे तू मराठी खूप चांगला बोलतो”.
आणखी वाचा – बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’
याचदरम्यान “मराठी इंडस्ट्रीमध्ये तुझं मार्केटिंग कमी पडलं. कमी पीआर झाला असं वाटतं का?” असाही प्रश्न अभिजीतला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मराठी इंडस्ट्री एवढी मोठीही नाही. पण माझा हिंदी चित्रपटसृष्टीकडे कल अधिक राहिला. कारण ‘इंडियन आयडल’ एक हिंदी प्लॅटफॉर्म होता. गाणीही मी हिंदीमध्येच शिकलो. माझे गुरुजीही नॉर्थ इंडियन होते. पण मी मराठी माध्यममधील मुलगा आहे. दादरच्या राजा शिवाजी शाळेतील मी विद्यार्थी आहे. माझा पहिला चित्रपटही हिंदी होता. पण त्यातही माझ्याबरोबर काम करणारे मराठीच होते. पण माझ्याबद्दल लोकांचा एक असा विचार आहे की, हा हिंदी करणारा मराठी मुलगा आहे”. अभिजीतने अगदी बेधडकपणे त्याचं मत मांडलं.





