सध्या सर्वत्र एका शोची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे आणि हाअ शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’… ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरु होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या घरात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ट्विस्ट येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वावर बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धकही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतल्यानंतर पुष्कर जोगचे वैयक्तिक आयुष्य चांगलंच चर्चेत आलं होतं. पुष्कर व त्याची पत्नी जास्मिन ब्रह्मभट्ट यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या अनेक अफवा सोशल मीडियावर झाल्या होत्या. मात्र या साऱ्यावर पुष्करने अनेकदा त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर उठत असलेल्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.
अशातच एका नेटकऱ्याने पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे आणि या नेटकऱ्याला अभिनेत्याने चांगलंच सुनावलं आहे. पुष्करने नुकतीच ‘एंडेमोल शाइन इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला ‘बिग बॉस मराठी’नंतर त्याच्या आयुष्यात काही बदल झाले का असं विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “बिग बॉसमुळे माझं आयुष्य बदललं. वाईट काळ सुधारला. थोडं यश मिळालं. माणूस म्हणून लोकांची व कुटुंबाची किंमत कळली. सोशल मीडियापलीकडचं आयुष्य काय असतं ते बिग बॉसमुळे कळलं. या शोने मला माझं दुसरं आयुष्य दिलं”.

याच व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझी पत्नी तुला सोडून गेली त्याचं काय? तुझं व्यावसायिक आयुष्य छान झालं पण वैयक्तिक आयुष्यात काय झालं तेही सांगा”. नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देत पुष्करने असं म्हटलं आहे की, “तुझ्या आईवडिलांशीही असंच बोलतोस का? माझं वैयक्तिक आयुष्य आहे. मी कोणाच्या बापाचं खात नाही. कळलं का फुकणीच्या”.
दरम्यान, पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. अनेकदा त्याने इतर सदस्यांबरोबर चूकीच्या पद्धतीने वागल्याने निक्की तांबोळीवर टीका केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पाचव्या पर्वात बिग बॉसच्या घरात नवीन कोणता कल्ला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.