हिंदी टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडत आली आहे. या कार्यक्रमात रोज एक नवीन व्यक्ती हॉटसीटवर बसते आणि त्या प्रत्येकाकडून व अमिताभ बच्चन यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळतात. ‘कौन बनेगा करडोपती’चे आतापपर्यंत एकूण १५ पर्व झाले असून नुकतंच या कार्यक्रमाचे १६ वे पर्व देखील सुरु झालं आहे. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागामध्ये कृष्णा सेलुकर नावाचा स्पर्धक हॉटसीटवर बसला होता. इंजिनियर असलेल्या कृष्णाची कोरोना काळात नोकरी गेली. यावेळी त्याने स्वत:ची भावनिक गोष्ट सांगत अविवाहित महिलांना ‘ओझं’ म्हटलं आणि यावर बिग बींनी आपली प्रतिक्रिया दिली. (Amitabh Bachchan reaction on Unmarried Women)
नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये सहभागी झालेल्या कृष्णा सेलुकरकडे इंजीनियरिंगची डिग्री असूनही त्याने बेरोजगार असल्याचं सांगत स्वत:ची तुलना ही अविवाहित महिलांशी केली. यावेळी तो म्हणाला, “सर, जर मी म्हटलं की, लग्न केलं नाही तर मुली या घरच्यांवर ओझं असतात. तसंच एका विशिष्ट वयानंतर बेरोजगार मुलंदेखील आपल्या आई-वडिलांवर तितकंच ओझं ठरतात”. हे ऐकताच अमिताभ यांनी कृष्णा यांना थांबवलं आणि त्यांना काही गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मुलगी ही कधीच ओझं नसते. मुलगी ही खूप मोठी शान असते”. सोशल मीडियावर या संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अमिताभ हे महिलांविषयीचे गौरवोद्गार काढत आहेत.
या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन असं म्हणत आहेत की, “ज्या महिला या नोकरी करत नाही, त्या सांगायला लाजतात की त्या गृहिणी आहेत. घरातील एखाद्या गृहिणीसारखं किंवा त्यांच्यापेक्षा जास्त काम आणि मेहनत दुसरं कोणी करत नाही. त्या सगळ्यात जास्त मेहनती असतात. त्या संपूर्ण घर सांभाळतात. नवऱ्याला सांभाळतात. खायचं-प्यायचं, मुलांचं सगळं काही सांभाळतात. त्याशिवाय त्या रात्र होण्याची प्रतीक्षा करतात की जोपर्यंत नवरा घरी येईल आणि मुलं जेवून झोपतील. तोपर्यंत त्या शांतीनं जेवू शकत नाहीत”.
आणखी वाचा – मराठी दिग्दर्शिकेच्या घरी झालेली चोरी, आरोपीला अटक झाल्यानंतर मोठा खुलासा, ड्रग्जसाठी पैसे खर्च केले अन्…
दरम्यान, कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम तर करतोच. मात्र याशिवाय अनेकदा या शोमध्ये स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कामदेखील या शोमधून होतं. यामुळे अनेकदा या कार्यक्रमात भावनिक संवादाची देवाणघेवाण होते. अनेकदा असं होतं की फक्त अमिताभ बच्चन नाही तर स्पर्धकही अशा काही गोष्टींचा खुलासा करतात ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळे भावूक होतात. अशातच ‘बिग बीं’चा महिलांबद्दलचा हाअ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.