Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत आलं असून ‘बिग बॉस’च्या घरात टीम A आणि टीम B मध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक टीममधील सदस्य स्वतःच्याच टीममधील सदस्याच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसतंय. सुरुवातीला टीम A मधील सदस्य निक्की तांबोळीच्या विरोधात एकही शब्द बोलत नव्हते. पण आता मात्र जसजसे दिवस पुढे सरकत आहेत तसतसे प्रत्येकाचे खरे चेहरे समोर येत आहेत. बिग बॉसच्या चक्रव्ह्यूमध्ये निक्कीला तिच्या मागाहून बोलणाऱ्या तिच्याच टीममधील सदस्यांची क्लिप दाखवली होती. त्यामुळे आता टीम A मध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात अरबाज व जान्हवी यांच्यात आर्याबद्दल हळू आवाजात काही संभाषण झालं. या संवादात अरबाजने आर्याबद्दल जान्हवीला असं म्हटलं की, “ती नंतर आपली वाट लावेल. तिला आता मोकळीक दिली तर ती आपल्याविरुद्ध जाऊ शकते. तिच्याबरोबर काही गोष्ट बोलल्यानंतर ती आपल्याशी मोकळेपणाने वागणार आणि यामुळे तिच्या मनात आपल्याविषयीची भीती निघून जाणार. म्हणून मी तिच्याकडे एखादा विषय टाळून दूसरा विषय काढतो. आधीसारखं मला आता पुन्हा अटकायचं नाहीये”.
यापुढे तो आर्याबद्दल असं म्हणतो की, “जेव्हा ती आपल्याबरोबर असते तेव्हा ती कायम तिचंच ऐकावं असं सांगत असते. ती नेहमी ऐका ना… ऐका ना… असं बोलत असते. पण तू मी आणि वैभव शांत विचार करुन बोलतो. तसं आपलं जास्त काही नाही”. या संवादात अरबाज व जान्हवी आर्याबद्दल तिच्या मागे बोलत आहेत. यावरून आर्या ही अरबाजची सध्या पूर्ती जोडीदार असली तरी त्याला तिच्यावर विश्वास नसल्याचे यातून दिसून येत आहे.
दरम्यान, आता येणाऱ्या पुढील काळात ‘बिग बॉस’च्या घरातील नात्यांची समीकरणे कशी बदलणार?, कोण कोणाबरोबर ठाम राहणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार? आणि कोणत्या सदस्याला शाबासकीची थाप देणार?, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.