नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यंदाच्या या पर्वात कलाकारमंडळींसह सोशल मीडिया स्टार्सनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घातला. या सर्वांमध्ये आपल्या कोल्हापूरी अंदाजाने धनंजय पोवारने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चांगलाच चर्चेत आला. ‘बिग बॉस मराठी’चा प्रवास संपल्यानंतर सर्वच स्पर्धक आपपल्या घराकडे निघाले आहेत. नुकताच विजेता सूरज चव्हाण त्याच्या मोढवे गावाकडे गेला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण गावाने हजेरी लावली होती. गुलाल उधळत, डीजेवर मिरवणूक काढत समस्त गावकऱ्यांनी सूरजचे कौतूक केलं. (Bigg Boss Marathi 5 fame Dhananjay Powar)
अशातच आता डीपीच्या गावीही त्याच्या गावच्या मंडळींकडून त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. डीपीच्या गावी डीजे लावून त्याची मिरणवुक काढली जाणार आहे आणि याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये डीपीच्या स्वागतासाठी डेकोरेशन आणि डीजे लावला जाणार असूनआपल्या लेकाच्या आगमनासाठी डीपीचे वडीलही फारक उत्सुक आहेत.
डीपी आणि त्याच्या वडिलांचे एक आगळे वेगळे नाते आहे. डीपी आपल्या वडिलांशी खूप काल बोलला नव्हता, पण ‘बिग बॉस’च्या घरात वडिलांना पाहून डीपीला अश्रु अनावर झाले होते. आपल्या बापाने आपल्याला एकदा तरी मिठी मारावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा ‘बिग बॉस’च्या घरात पूर्ण झाली. त्यानंतर या दोघांमधील खास नाते सर्वांना पाहायला मिळत आहे आणि त्याचीच झलक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, धनंजय पोवार आपल्या कॉमेडी व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आई व पत्नीबरोबरच्या त्याच्या अनेक विनोदी व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्यानंतर ‘बिग बॉस’मध्ये त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे आता यापुढे त्याची काय वाटचाल असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.