टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. प्रेक्षक हिंदी ‘बिग बॉस’सह ‘बिग बॉस’ मराठीदेखील तितक्याच आवडीनं पाहतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीचा पाचवा सीझन कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली. एका खास प्रोमोद्वारे ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख शो होस्ट करणार असल्याचेही समोर आले.
‘बिग बॉस’च्या नव्या होस्टची घोषणा होताच ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अभिनेते किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली होती. यावेळी “रितेशभाऊ, ‘बिग बॉस’ मराठी सिझन फोरमध्ये पहिल्यांदा पाहुणा म्हणून आलास तेव्हा ‘बिग बॉस’ने तुझ्या स्वागताची जबाबदारी माझ्यावर दिली होती. आता तू होस्ट म्हणून येतो आहेस हे कळल्यावर खूप आनंद वाटला. ‘बिग बॉस’ या खेळाची जाण असलेला, बायस्ड नसलेला, बॅलन्स्ड-कंपोज्ड होस्ट ‘बिग बॉस’ मराठीला गरजेचा होता. तुझा स्वभाव पहाता, तो तुझ्या रूपानं मिळाला असं वाटतं” असं म्हणाले होते.
अशातच आता किरण मानेंनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्टही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे बिग बॉस मराठीच्या आगामी सीझनबद्दल म्हणजेच बिग बॉस मराठीच्याअ पाचव्या सीझनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी रितेश देशमुखच्या कटआऊट असलेल्या फोटोशेजारी उभा राहून फोटो काढला आहे. तसेच या पोस्टद्वारे किरण मानेंनी “काहीतरी शिजतंय” असंही म्हटलं आहे.
त्यामुळे आता किरण मानेंचा ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनशी काही संबंध आहे का? ते या शोमध्ये पुन्हा एंट्री करणार आहेत का? की ते या शोमध्ये होस्ट म्हणून सहभागी होणार का? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळे किरण मानेंच्या या पोस्टचा ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनशी नेमका काय संबंध आहे? त्यांनी ही पोस्ट कशासंदर्भात केली आहे? हे येत्या काळात पाहायला मिळेल.