टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरचे वैवाहिक आयुष्य सध्या चर्चेत आले आहे. लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांनंतरच अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली आहे. २०२३ मध्ये दलजीत कौरने केनियातील व्यावसायिक निखिल पटेलबरोबर लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. दलजीत कौरने पती निखिल पटेलवर आपली फसवणूक आणि विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. यावरुन दोघांमध्ये वादही सुरु असलेले पाहायला मिळाले. (Daljeet Kaur On Nikhil Patel)
निखिल पटेल यांनी दलजीत कौरचे हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. निखिलने तर सांगितले होते की, त्याचे व दलजीतचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार झाले होते आणि ते कायदेशीररित्या नोंदणीकृत नव्हते. काही काळापूर्वी निखिल पटेलने दलजीत कौर यांना नोटीस पाठवून तिचे सर्व सामान केनियाहून नेण्यास सांगितले होते. दलजीतने आपले सर्व सामान घ्यावे अन्यथा तो दान करु असेही त्याने सांगितले होते. यानंतर आता दलजीतने त्याच्याविरुद्ध केनियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.

दलजीत कौर केनियाहून भारतात परतली असून अभिनेत्रीने अपडेट केले की निखिल तिचे सामान बाहेर काढू शकत नाही. अभिनेत्रीने केनियाच्या कोर्टाकडून त्यावर स्थगिती घेतली आहे. दलजीतसाठी ही एका नव्या लढाईची सुरुवात आहे आणि आता अभिनेत्री त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. याबाबतची पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत शेअर केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही जे काही बोललात त्यावर आम्ही विश्वास ठेवला, तुमच्या वृद्ध आई-वडिलांनी माझ्या आई-वडिलांसमोर हात जोडले, आम्ही यावरही विश्वास ठेवला”.
अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, “पण आता आम्हाला तुमच्या लोकांकडून सहानुभूती नको आहे. माझा जन्म लढण्यासाठी झाला आहे. निखिल पटेलने जे काही केले ते अत्यंत लज्जास्पद आहे”. याआधी दलजीत कौरने टीव्ही अभिनेत्री शालीन भानोतसह २००९ मध्ये लग्न केले होते. अभिनेत्रीला तिच्या पहिल्या लग्नात घरगुती अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. दलजीतने शालिन भानोतवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि २०१५मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.