Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे प्रत्येक पर्व हे भांडण वाद व राडे यामुळे जितके गाजते तितकेच ते घरातील मैत्रीच्या नात्यामुळेदेखील गाजते, ‘बिग बॉस मराठी’च्या प्रत्येक पर्वात कुणी ना कुणी एकमेकांचे कट्टर मित्र बनतात, ज्यांची घरात आणि घराबाहरेही तितकीच चर्चा होताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातही अशीच एक मित्रांची जोडी होती ती म्हणजे अरबाज व वैभव यांची. ‘बिग बॉस’च्या घरात हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे राहतील की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र हे दोघे एकमेकांविरुद्ध न खेळता एकमेकांसाठी खेळले. हे दोघे एकमेकांबरोबर इतके एकत्र राहिले की रितेशने वैभवला ‘अरबाजची सावली’ व ‘अरबाज २’ असं अनेकदा म्हटलं. पण तरीही वैभवकडून अरबाजबद्दलच्या मैत्रीत काही कमी दिसून आली नाही. (Vaibhav Chavan on friendship with Arbaaz Patel)
पण आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभवने अरबाजबरोबरची मैत्री ही फक्त माझ्या बाजूनेच असल्याचे म्हटलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर येताच वैभवला अरबाजबरोबरच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी वैभवने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. यावेळी तो म्हणाला की, “बाहेर जर तसं दिसलं असेल तर तसंच होतं ते. मीच त्याला अधिक महत्त्व देत होतो. पण त्याच्याकडून तसं फार काही नव्हतं हे मला आतमध्येच जाणवलं होतं. रितेश भाऊंनीही याबाबत मला कल्पना दिली होती. माझ्या कोणत्याच गोष्टीला त्याने विरोध केला नाही. तो माझ्याशी स्वतःहूनही कधी भांडला नाही. मीही त्याच्याशी स्वतःहून भांडलो नाही. किंबहूना घरातील इतर सदस्यांबरोबरही मी उगाच भांडणं केली नाहीत.
यापुढे वैभव असं म्हणाला की, “कदाचित अरबाजने माझा वापर करुन घेतला असंही असू शकतं. कारण तो आधीच गेम खेळून आलेला आहे. त्यामुळे माझा वापर करुन घेणं हा त्याचा गेमही असू शकतो. पण माझं त्याच्याबरोबर जे काही होतं ते तोंडावर होतं. मी त्यामध्ये कधीच गेम दाखवला नाही”. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील मैत्रीसाठी अरबाज पेक्षा मीच अधिक महत्त्व दिले असल्याचे त्याने यावेळी म्हटलं. असं असलं तरीही वैभव एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहिर करताच जान्हवीला अश्रू अनावर झाले तर अरबाज अगदी धाय मोकळून रडला. यावेळी तो रडत रडत रितेशला वैभवला घरात राहण्यासाठी आणखी एक संधी द्या असंही वारंवार म्हणताना दिसला.
आणखी वाचा – Video : मायरा वायकुळला भाऊ झाल्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांचा एकच जल्लोष, दीदी झाले म्हणत रडू लागली अन्…
दरम्यान, बारामतीचा रांगडा गडी असलेल्या वैभवकडून प्रेक्षकांना जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा त्याचा खेळ काही दिसला नाही, त्यामुळे प्रेक्षक नाराज होते. तो अरबाजच्या आड खेळतो, असंही त्याला सुनावण्यात आलं होतं. सोनं करण्याची संधी असूनही वैभव खेळत नाहीये, अशाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि अखेर तो या घरातून बाहेर आला आहे. परंतु या घरातील वैभव-इरिनाची मैत्री मात्र प्रेक्षकांना भावली.