‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व सुरु झालं तेव्हापासून हे पर्व चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या पर्वात पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये जुगलबंदी रंगलेली दिसली. सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी या भागात दमदार एण्ट्री घेत साऱ्यांच्या नजरा स्वतःकडे वळविल्या आहेत. तर वर्षा यांनी आल्या दिवसापासून साऱ्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. आणि ही गोष्ट इतर स्पर्धकांना खटकताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
काल समोर आलेल्या प्रोमोमध्ये वर्षा यांचं निक्की तांबोळीबरोबर भांडण झालं. इतकंच नव्हे तर इतर स्पर्धकांनीही वर्षा यांना बोल लगावले. मात्र वर्षा यांनी त्या चुकीचं वेळीच स्पष्टीकरण दिलं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या स्पर्धकांना प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे अगदी पहिल्याच दिवशी स्पर्धकांना प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घ्यावी लागली. दरम्यान स्पर्धकांनी ‘बिग बॉस’ची परवानगी न घेता बेडचा वापर केला. यावरुन ‘बिग बॉस’यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. याचा एक प्रोमो समोर आला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही, असं ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांना सांगतात. त्यावेळी ‘बिग बॉस’ची माफी मागत वर्षा “चुकून झालं”, असे म्हणते. त्यावर निक्की तांबोळी वर्षा यांच्यावर ओरडते. म्हणते, “तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय”. यावर वर्षा बोलतात की, “माझ्या एकटीमुळे नाही”. यावर निक्की आवाज चढवून बोलते, “तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती. जेव्हा झोपले होते तुम्ही”, असं बोलते. यावर वर्षा निक्कीला “ओरडू नकोस” असं सांगतात. त्यावर निक्कीही वर्षा यांना “शांत बसा”, असं म्हणते.
काल समोर आलेल्या ‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्ये, निक्की व वर्षा यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. सगळेजण लिव्हिंग एरियामध्ये जमलेले असतात तेव्हा वर्षा या मेकअप करत असतात. तेव्हा निक्की त्यांना बोलवायला येते, “पाणी कधीच आलं होतं, लवकर चला”, असं म्हणत त्यांना बोलावते. तेव्हा वर्षा त्यांना, “पाणी केव्हाच आलं होतं पण दुसरं कुणीतरी गेलं होतं. तिला सोडून कसं येणार”, असं म्हणत लिपस्टिक लावत असतात. त्यावर निक्की त्यांना “लिपस्टिक नंतर लावा”, असं सांगते. यावर वर्षा तिला, “लिपस्टिक नंतर लावा कसं, मला थोडंतरी करु दे. तू छान तयार होऊन गेली आहेस”, असं म्हणतात.