‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. कलाकारांची घरात रेलचेल सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकमेकांशी आता स्पर्धक बोलू लागले असून प्रत्येकजण आपापला परिचय देताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात सगळेच स्पर्धक हे कलाकार नसून विविध क्षेत्रातील आहेत त्यामुळे साऱ्यांना एकमेकांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच यंदा ‘बिग बॉस’च्या घरात छोटा पुढारी अशी लोकप्रियता असलेला घनःश्याम दरवडे याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
घनःश्याम सर्वांशी मिळून मिसळून वागताना दिसत आहे. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण खेळीमेळीचं राहावं म्हणून तो विनोद करतानाही दिसत आहे. निक्की व अरबाज यांचं नातं फुलवण्यासाठीही घनश्याम मदत करताना दिसला. सोशल मीडियावर बेधडक मत मांडण्यात घनश्याम नेहमीच पुढे असतो. गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर अनेकदा त्याने स्पष्ट भाष्य करत मत मांडलं आहे. इतकंच नव्हे तर शेतकरी कुटुंबातील घनःश्यामने शेतकऱ्यांची व्यथाही मांडली आहे. घनःश्यामच्या भाषणाने अनेकांची बोलती बंद केली आहे.
“‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच दिवशी पाणी बंद झालं. यावेळी घरातील सगळे सदस्य एकत्र असताना घनःश्यामने त्याच्या खऱ्या आयुष्यातील कामाबाबत सगळ्यांना सांगितलं. यावेळी त्याने एक किस्साही सांगितला. घनश्याम म्हणाला, “माझ्यामुळे माझ्या येथील एक आमदार निवडणूकीमध्ये पडला. तो आमदारही आमच्याच तालुक्यातील होता”, असं घनश्याम म्हणाला. यावर “तुझ्यामुळेच आमदार पडला हे तुला कसं कळालं?” असा प्रश्न वर्षा यांनी घनश्यामला विचारला.
तेव्हा तो म्हणाला, “त्यादरम्यान नेमकं माझं भाषण झालं. ते भाषण लोकांना इतकं भावलं की, मीडियावाल्यांनीही ते उचलून धरलं. जे आमदार ३५ वर्षांमध्ये सात वेळा निवडूण आले, ज्यांना कोणी निवडणूकीमध्ये पाडू शकलं नाही ते एका चिमुरड्याच्या भाषणामुळे हारले. जनतेवर त्या भाषणाचा प्रभाव झाला. तो आमदार पडल्यानंतर सगळी परिस्थिती सुधारली. माझ्या गावात रस्ता झाला. गावात एसटी यायला लागली. पाण्याचाही प्रश्न सुटला”.