Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. या सीझनमध्ये नेते, अभिनेते, यांसह कीर्तनकार व सोशल मीडिया स्टार्सनेदेखील स्हभाग घेतला होता. एकूण १६ स्पर्धकांपासून सुरु झालेला ‘बिग बॉस मराठी ५’ चा प्रवास आता अवघ्या ६ जणांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस मराठी’ला यंदाचे टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत. अंकिता, जान्हवी, निक्की, डीपी, अभिजीत आणि सूरज. या सर्व स्पर्धकांची पहिल्या दिवसापासूनच चर्चा रंगली होती. मात्र यापैकी सूरज चव्हाणची चर्चा जरा अधिकच होती. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलेसे केले आणि तो आता महाअंतिम सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. सोशल मीडियावर तर त्याच्या विजेता होण्याच्या अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत. अनेकजण त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. या पाठिंबा देणाऱ्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे उत्कर्ष शिंदे. गायक, संगीतकार, अभिनेता उत्कर्ष शिंदे सूरजला अगदी पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या…
अशातच त्याने सूरजसाठी नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “कपाळावरील रेषेमुळे नाही तर कपाळावरील घामामुळे तू कालही विजेता होतास आजही आहेस आणि उद्याही तूच विजेता राहशील… माझ्या सर्व प्रार्थना तुझ्याबरोबर आहेत”. तसंच उत्कर्षने शेअर केलेल्या पोस्टवर त्याचा सूरजबरोबरचा फोटो पाहायला मिळत आहे आणि यावर ‘विजेता’ असंही लिहिलेलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणने ‘टिक टॉक’च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा ‘गोलीगत’ हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. ‘बिग बॉस’च्या घरातही त्याच्या अनेक डायलॉगची चर्चा रंगली होती. सुरुवातीला त्याला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या या घरातील एन्ट्रीवर नाक मुरडणाऱ्यांची सूरजने आपल्या वागणुकीतून मनं जिंकली आहेत. त्याला गेम कळला नसला तरी त्याला माणसं कळली अशा शब्दांत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.