Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ला सुरु होऊन आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. या घरातील बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला चांगलेच खेळ खेळू लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. निक्की बोलण्याच्या ओघात, चढ्या आवाजात बोलताना वर्षा उसगावंकर यांच्यासह घरातील इतर सदस्यांनादेखील उलटसुलट बोलली आहे. यावरुन ‘भाऊचा धक्का’मध्येही रितेश देशमुखने निक्कीला चांगलेच झापले आहे. मात्र, त्यानंतरही निक्कीच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला घरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
निक्कीच्या वागण्याचा घरातील सर्व सदस्यांना त्रास होतो आहे. तिच्या मुजोर वागण्यावर अनेकांनी संताप व आक्षेपही घेतला आहे. मात्र निक्कीच्या वागण्यात काहीही सुधारणा झालेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे तिच्या वागणुकीत बदल घडवणून आणण्यासाठी या शोमध्ये राखी सावंतच यावी अशी इच्छा अनेक नेटकरी करत आहेत. राखी सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आली तरच निक्की सुधारेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना वाटत आहे. अनेक प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकार मंडळींनादेखील राखी सावंतने ‘बिग बॉस’च्या घरात यावे असं वाटत आहे. याबद्दल अनेकांनी जाहीररित्या त्यांच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
‘मुरांबा’ मालिकेतील अभिनेता शशांक केतकरची बायको प्रियंका केतकरनेही आता राखी सावंतने याशोमध्ये यावे असं म्हटलं आहे. कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’च्या शेअर केलेल्या एका पोस्टखाली तिने कमेंट करत याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे. प्रियंकाने या पोस्टखाली अशी कमेंट केली आहे की, “‘बिग बॉस मराठी ५’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून कृपया राखी सावंतला आणा. मग येईल खरी मज्जा!” प्रियंकाच्या या मागणीला अनेक नेटकऱ्यांनीदेखील सहमती दर्शवली आहे. “अगदी बरोबर, राखी आल्यावर निक्कीची वाट लागेल” अशा कमेंट्सद्वारे प्रियंकाच्या मागणीला प्रेक्षकांनी सहमती दर्शवली आहे.
आणखी वाचा – गणेशोत्सवात एकच गाणं वाजणार!, ‘बाप्पा आमचा आला’ लवकरच तुमच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेली निक्की ही इतर सदस्यांना जुमानत नाही. त्याशिवाय, तिला जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणची साथ मिळते. ‘हिंदी बिग बॉस १४’ मध्ये राखी व निक्की यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा राखीने निक्कीला जशास तसे उत्तर दिले होते. दोघींमधील वादात अनेकदा निक्कीने राखीसमोर माघार घेतली होती. त्यामुळे आता निक्कीच्या मुजोर वागण्याला रोखण्यासाठी शोमध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्री करुन यावी अशी मागणी केली जात आहे.