Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन फारच लक्षवेधी ठरताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमधील सदस्यांचा चांगलाच बोलबाला आहे. घरातील सदस्यांना ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. अशातच शनिवार व रविवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर प्रेक्षकांना डान्सचा तडका पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांनी घरामध्ये एकापेक्षा एक लयभारी डान्स परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. यावेळी गोलीगत सूरज चव्हाणही वेगळी स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सूरज चव्हाण झापुक झुपूक स्टाईलने डान्स करताना दिसला. यावेळी त्यावा जान्हवी किल्लेकरचीही साथ मिळाली. सूरज व जान्हवी या जोडीने ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर डान्स करताना दिसले. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
यावेळी भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखने सूरज चव्हाणच्या डान्ससह शर्टचेदेखील कौतुक केलं. ‘बिग बॉस’मध्ये सूरजला खास शर्ट दिलं गेलं. यावर भाऊचा धक्का, झापूक झुपुक, एसक्यु, आरक्यु, झेड क्यु अशा त्याच्या लोकप्रिय डायलॉगचा समावेश होता. तसंच ‘गोलीगत धोका’ असा डायलॉगही त्यावर लिहिलेला पाहायला मिळालं. तसंच त्याच्या शर्टवर अनेक तुटलेल्या हृदयाचे डिझाईन होते. याबद्दल रितेशने त्याला असं विचारलं की, “यावर तुटलेले हृदय आहेत. तर हे तुटलेले हृदय तुमचे आहेत की तुम्ही तोडलेले आहेत. यावर सूरज त्याच्या शैलीत असं म्हणतो की, “मला फक्त एकच गोलीगत धोका मिळाला आहे”. यावर घरातील सर्वजण हसायला लागतात. पुढे घरातील सर्व स्पर्धकांना त्यांच्या नावाने सोशल मीडियावरील व्हायरल रील्सही दाखवण्यात आले.
यावेळी सूरजलादेखील त्याचे व्हायरल रील दाखवले गेले. निक्की व सूरज यांनी एकमेकांशी मागच्या भागात त्याच्या ब्रेकअपबद्दल चर्चा केली होती. यावेळी निक्कीने सूरजला “तुला प्रेमात धोका मिळालाय?” असं म्हटलं होतं. त्यावर सूरजने असं म्हटलं होतं की, “माझ्याबरोबर चांगली राहायची, बोलायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोरापान, तर लगेच गेली मला सोडून. गुलिगत धोका दिला मला”.
निक्की व सूरज यांचा हा संवाद सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि यावर अनेक रील्सही बनले. याच रील्स स्पर्धकांना दाखवण्यात आले. यावर घरातील स्पर्धकही पोट धरून हसले. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा रविवारचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. रितेशने सर्वांची शाळा घेतलीच पण त्यानंतर त्याने सर्वांशी आगळे-वेगळे टास्क खेळत मजामस्तीही केली. निक्की-अरबाजमध्ये पुन्हा एकदा पॅचअप झालं आणि दुसरीकडे त्यांच्या गेमबद्दलही चर्चा रंगली.