Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’चा शो म्हणजे अनेक ट्विस्टने भरलेला शो. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवशी नवनवीन ट्विस्ट येत असतात. दिवसागणिक बिग बॉसच्या घरात अनेक नाती बनतात आणि अनेक नाती तुटतातही. अशातच नुकत्याच झालेल्या शनिवारी व रविवारी झालेल्या भाऊचा धक्क्यानंतर आता घरात नवीन समीकरणं तयार होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. टास्कच्या वेळी एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यात आजच्या भागात संवाद होताना दिसणार आहे. यामध्ये निक्की हे अभिजीतचे सत्य सांगणार आहे. एकीकडे घरात नॉमिनेशनसाठी कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
अभिजीत आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्कीही अंकिताला अभिजीतबद्दल सांगणार आहे. निक्की व अभिजीतच्या मैत्रीवर अंकिताने अनेकदा आक्षेप घेतले आहेत. अभिजीतने निक्कीबरोबर मैत्री करणे म्हणजे ग्रुपला धोक्यात घालण्यासारखं असल्याचे अंकिताने याआधी म्हटले. अशातच आता निक्की व अंकिता एकमेकांबरोबर अभिजीतविषयी संवाद साधणार आहेत. कलर्स मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्की अंकिताला म्हणते, “माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याला तुझ्यावर आहे. कारण, तुम्ही पहिल्या दिवसापासून एकमेकांबरोबर आहात. आमची मैत्री वाढली; पण त्याचं तुझ्याबरोबर असलेलं नातं हे तसंच आहे”.
आणखी वाचा – “आई आणि बाबा रिटायर होत आहेत” निवेदिता सराफांची नवी मालिका, प्रेक्षक म्हणाले, “नवीन असावरी…”
यापुढे ती असं म्हणते की, “जेव्हा एलिमिनेशनसाठी तुझं नाव घेतलं होतं. त्यावेळी तो म्हटला होता, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो तुला माझ्याहून वरचा दर्जा देतो आणि त्याला तुझी गरजपण आहे. पण, तू बोलत नाही आहेस. ठीक आहे, तुझ्या डोक्यात काहीही विचार असेल. मी फक्त इथे स्पष्ट करायला आलीय की, जर त्याला तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणाला निवडायचं असेल, तर तो नेहमीच तुला निवडेल”. यावेळी अंकिता निक्कीचं बोलणं शांतपणे ऐकताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत व अंकिता यांच्यातील मैत्रीमध्ये कुठे तरी दुरावा असल्याचे भासत आहे. त्यात अभिजीत व निक्की यांची जोडी बनल्यानंतर अभिजीत स्वत:चं डोकं न वापरता केवळ निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे वागत असल्याचेही अंकिताने सुनावले आहे. पण आता निक्कीने अंकिताशी साधलेल्या या संवादानंतर अंकिता व अभिजीत पुन्हा एकत्र येणार का? त्यांची मैत्री पूर्ववत होणार का?, की या जोडीत आता काही नवीन पाहायला मिळणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.