Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बहुप्रतिक्षीत अशा ‘फॅमिली स्पेशल’ भागाला आता सुरुवात झालेली आहे. गुरुवारच्या भागात या घरातील स्पर्धकांच्या कुटुंबियांचा प्रवेश होण्यास सुरवात झाली होती. गुरुवारी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत, डीपी, वर्षा व जान्हवीच्या कुटुंबियांनी प्रवेश केला होता. घरातील कुटुंबियांना पाहून सर्वच सदस्य भावुक झाले होते. अशातच आजच्या भागात अंकिता, निक्की, सूरज या सदस्यांच्या कुटुंबियांचा घरात प्रवेश होणार आहे. याबद्दलचे प्रोमो सोशल मीडियार व्हायरल होत आहे. सूरजच्या आयत्या व बहीणींच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशानंतर आता पॅडी कांबळे यांच्या लेकीदेखील ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. (Pandharinath Kamble Emotional)
पॅडी कांबळे यांच्या मुलींच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये बिग बॉस सर्वांना फ्रीज करतात आणि म्हणतात की, “या घराने एका विनोदवीराला हसताना आणि इतरांना हसवताना पहिले. पण आता हे घर त्या विनोदवीरीला मनसोक्त जगताना पाहणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात येणार आहेत. त्याच्या आयुष्यातील ‘त्या दोघी”. यानंतर घरात त्याची दोन लेकींची एन्ट्री होते आणि घरात लेकींचा प्रवेश होताना पाहून पॅडी कांबळे यांना अश्रू अणावर होतात. त्या दोघी पॅडी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठी मारतात. पण पॅडी फ्रीज असल्यामुळे ते काही करु शकत नाहीत.
मग ‘बिग बॉस’ पॅडी कांबळेंना फ्रीजपासून मुक्त करतात आणि मग पॅडी लेकींना घट्ट मिठी मारतात. या बाप-लेकींचा हा व्हिडीओ पाहून घरातील इतर सदस्यही भावुक होतात. पॅडी कांबळे व त्यांच्या या दोन मुलींचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “बाप हा बापच असतो”, “मुलगी आणि वडील हे या जगातील अनमोल नाते आहे” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शो चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच फॅमिली एपिसोड पार पडला. पहिल्यांदा, वर्षा ताईंची मनीषा बहीण येते. तिला पाहून वर्षा ताई खूप भावुक होतात. मग जान्हवीचा नवरा व मुलगा भेटायला येतात आणि मग एपिसोडच्या शेवटी डीपीचे वडील, पत्नी आणि आई घरात प्रवेश करतात.