Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही बाकी सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. गेल्या आठवड्यात सुरज, पॅडी हे स्पर्धक शांत होते. मात्र यांनी बोलावे असं रितेशने ‘भाऊचा धक्का’मध्ये त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता येत्या आठडव्यात या दोघांचा नवीन गेम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. गेल्या आठवड्यात या दोघांनी घरातील कार्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता केवळ वरवर पाहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे हे जर सहभागी झाले नाहीत, तर त्यांना घरात राहणे अवघड होईल असं रितेशने सांगितलं होतं. त्यामुळे आता येत्या आठवड्यात दोघांचा खेळ पाहणे रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 5 update)
अशातच सूरजने त्याचा खरा खेळ सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्याचा एक नुकताच प्रोमो समोर आला आहे, ज्यात तो जान्हवीबरोबर भांडताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणते की,”तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही”. त्यावर सूरज जान्हवीला म्हणतो की,”तू निघ… चल फूट”. गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल.
‘बिग बॉस मराठी’च्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. यात त्याने सूरजलादेखील सांगितले की, “तुला जे काही वाटतं आहे ते तू बोल. हे तुझंही घर आहे”. यावे सूरजनेही “हो, भाऊ मला आता गेम कळत आहे” म्हटलं होतं. ‘भाऊचा धक्का’ या खास कार्यक्रमात रितेशने काही खास टास्क केले. यामध्ये स्पर्धकांमध्ये आपापसात चांगलीच जुंपली. घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली.
‘भाऊचा धक्का’ या भागाच्या शेवटी त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि हा स्पर्धक होता पुरुषोत्तम दादा पाटील होते. त्यामुळे आता या आठवड्यात घरातील उरलेले सदस्य त्यांचा खेळ कसा खेळणार? खेळ खेळताना एकमेकांबरोबर ते कसे वागणार हे पाहावे लागेल. दरम्यान, २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना नुकताच एक आठवडा सुरु झाला असून या पर्वाची सुरुवात भांडण व वादांनी झाली. आता अजून पुढे घरात काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.