Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना महाटास्क देण्यात आला आहे. यंदाच्या सीझनच्या विजेत्याला २५ लाख रुपये रक्कम मिळणार असल्याचं घोषित केलं असलं तरी या रकमेसाठी स्पर्धकांना मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. विजेत्याला ही २५ लाख रुपयांची रक्कम टास्क पूर्ण केल्यावरच मिळणार आहे. हा टास्क खेळण्यासाठी ‘बिग बॉस’ने घरात एकूण आठ स्पर्धकांच्या चार जोड्या बनवल्या आहेत. या चार जोड्यांना प्रत्येकी ६ लाख २५ हजार एवढी रक्कम टास्कमधून जिंकून आणायची आहे. जर एखादी जोडी ६.२५ लाख ही रक्कम जिंकण्यात अयशस्वी ठरली तर, तेवढे पैसे बक्षिसाच्या रकमेतून वजा केले जाणार असल्याचं ‘बिग बॉस’ने घोषित करत साऱ्यांना धक्का दिला.
हा महाचक्रव्ह्यू टास्क खेळण्यासाठी सुरुवातीला जान्हवी व धनंजय ही पहिली जोडी गेली. या दोघांनी १ लाख ३० हजार इतकी रक्कम कमावली. यानंतर गेलेल्या अभिजीत-अंकिताने ३ लाख १५ हजार कमावले. तर, टास्कमध्ये सहभागी झालेल्या तिसऱ्या जोडीने म्हणजेच निक्की-वर्षा यांनी २ लाख ८५ हजार कमावले. या तीन जोड्यांनी मिळून एकूण ७ लाख ३० हजार रुपये कमावले. आता पॅडी व सूरज यांचा खेळ शिल्लक असून तो आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. पॅडी व सूरज ही जोडी यांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या रकमेत विजेत्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून किती लाख मिळणार हे स्पष्ट होणार असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 चा महाचक्रव्यूह टास्क जिंकण्यासाठी पॅडी व सूरज यांची दमछाक, बाजी मारणार का?
तीनही जोड्यांनी अगदी उत्तम खेळ खेळला. मात्र या जोड्यांमध्ये निक्की व वर्षा ताई यांची जोडी अधिक चांगला खेळ खेळू शकली असती असं निक्कीला वाटलं. हा टास्क संपल्यावर निक्की प्रचंड नाराज झालेली दिसली. अजून झेंडे गोळा करुन आणखी रक्कम जिंकता आली असती, असा विचार करुन ती उदास झाली. याशिवाय या टास्कमध्ये तिच्या हातून एक मोठी चूक घडली. महाचक्रव्युहात ५० हजार रक्कम लिहिलेली चांदीची वीट एका भांड्यावर ठेवण्यात आली होती. निक्कीने त्या चांदीच्या विटेऐवजी रिकामी भांडं उचललं त्यामुळे त्यांच मोठं नुकसान झालं. वर्षा यांनी व्यवस्थित मार्गदर्शन न केल्यामुळे त्यांच्या टीमला ५० हजारांचा फटका बसला.
बिग बॉस’ने घडलेली चूक सांगताच निक्की मोठमोठ्याने रडू लागली. “खरंच आपण काय खेळलो याची मला लाज वाटतेय. मी कोणालाही दोष देत नाहीये पण, खरंच चांगला खेळता आलं असतं”, असं म्हणत ती रडत होती. त्यानंतर निक्की पॅडी दादा व सूरज यांना चांगला खेळ खेळण्यासाठी सपोर्ट करताना दिसली. आता सूरज व पॅडी त्यांच्या या टास्कमध्ये कसा गेम खेळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.