Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा तिसरा आठवडा चांगलाच गाजला. घरातील सदस्यांनी प्रत्येक टास्क जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण याची चर्चा चांगलीच रंगली. खेळत असताना सदस्य माणूसकीच विसरले. कोणी शाब्दिक मारा केला तर कोणी अगदी हाणामारी करत जिंकण्याचा प्रयत्न केला. आपली मर्यादा ओलांडत खेळ खेळणं कितपत योग्य आहे? हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. सदस्यांची वागणूक पाहून प्रेक्षकांबरोबरच ‘बिग बॉस मराठी’ बघणाऱ्या कलाकारांचाही राग अनावर झाला. या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरेत हिरो ठरला तो सूरज चव्हाण. सूरजने त्याचा गेम प्लॅन करत माणूसकीही राखली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कौतुक होत आहे. इतकंच काय तर चक्क रितेश देशमुखनेही त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘कलर्स मराठी’ वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये रितेश सूरजचं कौतुक करत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. या प्रोमोमध्ये रितेश त्याला असं म्हणतो की, “या आठडव्यात एका हिरोने जन्म घेतला आहे. ज्याने त्या संधीचं सोनं केलं आहे. त्याचं नाव आहे सुरज चव्हाण. तुम्ही एकट्याने या सर्वांचा हिंमतीने सामना केला”. यापुढे रितेश सूरजसाठी एक डायलॉग म्हणतो. यापुढे रितेश “भेडिया झुंड में आते हैं” असं म्हणत असतानाचं त्यापुढे सूरज “लेकीन शेर अकेला आता है” असं म्हणतो.
‘बिग बॉस मराठी ५’मधील सूरज चव्हाण हे नाव बरंच गाजतंय. सुरुवातीपासून सूरजचा खेळ प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेक कलाकारही त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच रितेशनेही त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो… एक ‘भाऊचा धक्का’ संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार? याची ‘बिग बॉस’ प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे.