Kolkata Rape Case : पश्चिम बंगालमध्ये ०९ ऑगस्ट रोजी एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे. कोलकात्यातही निदर्शने होत आहेत. या घटनेत आरोपींना काठोरातली कठोर शिक्षा व्हावी याची मागणी केली जात आहे. या घटनेबद्दल सामान्य नागरीकांसह कलाकार मंडळींनी आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांकडून सोशल मीडियावर या घटनेबाबत आवाज उठवला आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक व रोहित परशुराम यांसारख्या अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Marathi Artists on Kolkata Rape Case)
अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरने या घटनेवर एक खास पोस्ट शेअर करत तिचं म्हणणं मांडलं आहे. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “सगळं भान तिने जपायचं, मुलगी म्हणून स्वतःला सावरायचं, नीट बसायचं, मोठ्याने नाही हसायचं, चार-चौघात कमी बोलायचं. लोक नाय हे सतत ध्यानात ठेवायचं थोडक्यात स्वतःसाठी नाहीच जगायच. सुंदर, सुडौल दिसायचं, जमत असेल, झेपत नसेल तरी Diet, Exercise अंगी बाळगायच नाहीतर लग्नाच्या मार्केटमध्ये कुणी पसंत करायच ?? थोडक्यात मुलगी म्हणून “स्वतःला Prove करायचं”.
यापुढे त्यांनी “शिकायचं, खेळायचं, नाचायचं, गायचं सर्वगुण संपन्न व्हायच. स्वयंपाकात पारंगत व्हायचं. मॅरेज मटेरियल व्हायचं संस्कारी, संसारी व्हायचं Harmonal Imbalanceला कुरवाळायचं, Savings Investmentsचं Knowledge ठेवत हातात wine glass घेवून Updated पण राहायचं आणि “अरे मुलगी Drive करत असणार” असं म्हणून तुम्ही तिला Degrade करायचं. Doctor, Actor, Inspector सगळीकडे तिने बरोबरीने उभं रहायचं, सरते शेवटी घरी येऊन तिनेच राबायचं, सुंदर-सुडौल म्हणत दिसण्याच भान तिने जपायचं नाही तर छछोर, बाहेरख्याली विशेषण तिच्या नावामागे लागायचं. एखादी छान हसून, मोकळ ढाकळ बोलली की, त्याला तुम्ही आमंत्रण समजायचं. कस हसायचं, कस बोलायचं, कस वागायचं यावर तुम्ही बंधन लावायचं, सर्वगुणसंपन्न, प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिला Judge करायचं, Mariage Materialचं बिरुद तुम्ही तिच्यावर थोपायचं आणि वाटेल तसं ओरबाडून तुम्ही, शेवटी तिलाच लांछन लावायचं”.


रसिकाबरोबर सौरभ गोखलेनेही याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “बलात्कार करण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारास सर्वांसमक्ष भर चौकात फाशी दिल्यास अथवा त्याचा चौरंग केल्यावरच हे प्रकार थांबू शकतील”. तसंच श्रेयस तळपदेनेही यावर संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टद्वारे असं म्हटलं आहे की, “पता नहीं कौन मोमबत्तियां पकड़ना सिखा गए हमें, वरना नारी के सम्मान में तो लंका दहन और महाभारत करने की संस्कृति थी हमारी”. दरम्यान, कोलकाता बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे