‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. १०० दिवस चालणाऱ्या या शोने यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांत आपला गाशा गुंडाळला. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली आहे आणि या ग्रँड फिनालेला नुकतीच सुरुवातदेखील झाली आहे.
‘बिग बॉस मराठी ५च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला अगदी दणक्यात सुरुवात झाली असून स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. आजच्या या ग्रँड फिनालेच्या विशेष भागात घरातील सर्व स्पर्धकांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या काही प्रोमोमधून ग्रँड फिनालेची झलक पाहायला मिळाली आहे.
आजच्या या ग्रँड फिनाले सोहळ्यात सूरज व अभिजीत यांचा डान्स पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जान्हवी व निक्कीदेखील आयटम सॉंग सदर करणार आहेत. तसंच डीपी व अंकिता यांचादेखील धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनाच या ग्रँड फिनालेची उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच दोन आठवड्यांनी होस्ट रितेश देशमुखही ग्रँड फिनालेला हजेरी लावणार आहे. तया त्याच्या पुनर्गमनाकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, आजच्या या फिनालेमध्ये शोचा विजेताही घोषित केला जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी बाजी मारत ‘बिग बॉस मराठी ५’च्या झगमगत्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.