‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्व गाजवणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. या शोमध्ये तिला टास्क क्वीन म्हणून ओळखलं गेलं. बिग बॉस मराठीमध्ये अभिनेत्री अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. बिग बॉसमध्ये टास्क खेळणं असो वा पॅडी कांबळे यांचा अपमान असो. प्रत्येक कारणाने जान्हवी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र त्यानंतर आपल्या वागणुकीने तिने सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही तिने यअनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. अशातच आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री लवकरच एका मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (janhavi killekar entry in aboli serial)
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच्या नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार आहे याचा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात झाला आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ च्या नुकत्याच झालेल्या भागात एक चोर सिद्धार्थ जाधवकडे येतो आणि सांगतो की, मी एक चोर असून मला मॅडमनी खूप मारलं आहे. तेव्हा सिद्धार्थ विचारतो, “तुला कोणी मारलं?” तर चोर म्हणतो, “पोलीस मॅडमने मारलं.” त्यानंतर जान्हवीची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली.
‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या या भागात ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘अबोली’ मालिकेची टीम सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ‘अबोली’ मालिकेच्या टीमच्या कलाकारांनी फिकट गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहेत. तसंच जान्हवीने देखील फिकट गुलाबी रंगाचा आउटफिट घातला आहे. त्यामुळे जान्हवी किल्लेकरची ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री होणार असल्याचे समोर आले. या मालिकेत ती इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही डॅशिंग भूमिका साकारणार आहे.
त्यामुळे आजवर नकारात्मक भूनिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जान्हवी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या नवीन भूमिकेसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. तिला या नवीन भूमिकेत बघण्यासाठी आतुर असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याआधी जान्हवी किल्लेकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती