हिंदी टेलिव्हिजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे चित्रपट, वेबसीरिज आणि क्राईम पेट्रोल सारख्या शोमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारी याच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाला आहे. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राघव गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोहम्मद जैद परवेझ शेख याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Raghav Tiwari attacked)
घटनेबद्दल अभिनेता राघव तिवारीने सांगितले की, घटनेच्या वेळी तो त्याच्या मित्राबरोबर खरेदी करुन घरी परतत होता. रस्ता ओलांडत असताना त्याची दुचाकीला धडक बसली. यात त्याची चूक होती, म्हणून त्याने लगेच माफी मागितली आणि पुढे जाऊ लागला. मात्र आरोपी दुचाकीस्वाराने शिवीगाळ सुरु केली. राघवने याचे कारण विचारले असता आरोपीने दुचाकीवरुन खाली उतरून रागाच्या भरात त्याच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला केला. राघवने कसेतरी स्वतःला सावरले. यानंतर आरोपीने त्याला लाथ मारली, त्यामुळे तो खाली पडला.
पुढे राघवने सांगितले की, आरोपींनी दुचाकीच्या ट्रंकमधून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. संरक्षणासाठी राघवने रस्त्यावर पडलेले लाकूड उचलले आणि आरोपीच्या हातावर मारले, त्यामुळे बाटली खाली पडली. यानंतर बाईकस्वाराने राघवच्या डोक्यात लोखंडी रॉडने दोन वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर राघवच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आणखी वाचा – सेटवरील मेकअप मॅनसाठी धावून आला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे सांगितली संपूर्ण व्यथा, मदतीचेही केलं आवाहन
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत राघव म्हणाले की, आरोपी अजूनही अटक टाळून मोकळे फिरत आहेत. आरोपी त्याच्या इमारतीच्या खाली दिसत असल्याचेही त्याने सांगितले. आपल्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काही झाले तर त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल, अशी चिंता राघवने व्यक्त केली.