मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःच्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. ‘बड़ी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत तिने उत्कृष्टरित्या खलानायिका म्हणजे संजनाची भूमिका साकारली आहे. आज रुपाली संजना म्हणून अधिक ओळखली जात आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच एक महागडी नवीन कार खरेदी केली आहे आणि याचा खास व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (rupali bhosale new luxury car)
अभिनेत्रीने महागड्या नवीन कारसह तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने आपल्या आनंदी भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “हे सर्व सुरु झाले ते म्हणजे एक दिवस मी तुला विकत घेईन या वाक्यापासून आणि आज तो दिवस आला आहे. तुम्ही तुमच्या जीवनाची स्वप्ने फक्त पाहू नका. तर तुमची स्वप्नं जगा. तुमच्या स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम घ्या. कितीही कठीण असले तरी स्वतःला वचन द्या की तुम्ही तुमची स्वप्ने कधीच सोडणार नाही. तुम्ही काय करू शकत नाही ते स्वतःला सांगू नका. तुम्ही काय करू शकता ते स्वतःला सांगा”
यापुढे रुपालीने “तुझे स्वागत आहे आता आपण एकत्र आणखी पुढे जाऊ” असं म्हणत तिच्या नव्या अलिशान कारचे स्वागत केलं आहे. रुपालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती गाडी खरेदी करायला गेली असून तिच्या स्वागतासाठी तिचे फोटो लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावेळी तिचे हटके स्वागतही करण्यात आले. यानंतर या व्हिडीओमध्ये तिच्या गाडीची खास झलकही शेअर करण्यात आली आहे. यावेळी अभिनेत्री गाडीची तिच्या हाताने पूजाही करण्यात आली. या नवीन गाडीच्या खरेदीवेळी तिच्याबरोबर आई-वडीलही उपस्थित होते.
दरम्यान, रुपालीच्या नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे या कलाकारांनी व रुपालीच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नुकतीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र या मालिकेने गेल्या महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता तिच्या नवीन भूमिकेची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत.