‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे घराघरांत लोकप्रिय झाला. आता शो संपल्यावर हे सगळे स्पर्धक आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. ‘छोटा पुढारी’ शो संपल्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला. पोस्ट, व्हिडीओ शेअर करत तो सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतो. त्याचबरोबर तो त्याचे काही वैयक्तिक व्हिडीओ व फोटोही पोस्ट करत असतो. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. (Ghanshyam Darawade trolled)
सोशल मीडियावर घन:श्यामच्या अनेक व्हिडीओला पसंती मिळताना दिसते. मात्र यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगवर काही जण दुर्लक्ष करतात, मात्र छोटा पुढारी या ट्रोलर्सला त्याच्या भाषेत उत्तरं देतो. नुकतंच त्याने मकर संक्रांतीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो एका आजीबरोबर भाजीची जुडी बांधताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओद्वारे अनेकांनी नकारात्मक कमेंट करत घन:श्यामला ट्रोल केलं आहे. तर या ट्रोलर्सलाही त्याने आपल्या शैलीत उत्तरं दिली आहेत.
या व्हिडीओवर एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “अरे असे कपडे घालून शेती करता येत नाही, असे कपडे घालून फक्त व्हिडीओ काढता येतात”. यावर घन:श्यामने त्याला असं उत्तर दिलं आहे की, “तुमच्यासारखा नुसते लोकांचे रिल बघत नाही तर मी स्वतः रोज नवीन कपडे घालून माझ्या शेतात जातो”. तसंच यापुढे त्याने “का बंर दादा शेतकऱ्यांनी नवीन कपडे घातले तर लगेच टोचतं का?” असंही म्हटलं आहे. तर एकाने या व्हिडीओखाली घन:श्याम “दिखावा” करत असल्याची कमेंट केली आहे. या नेटकऱ्याला उत्तर देत छोटा पुढारीने असं म्हटलं आहे की, “अशा लोकांना शेतकऱ्याची काय किंमत कळणार?”.

यापुढे आणखी एकाने “जर अशी भाजीची पेंडी बांधली तर मार्केटमध्ये जाईपर्यंत सुटून जाईल पुढारी”. यावर घनश्यामने त्याला उत्तर देत “दादा मी अजून नवीन आहे” असं म्हटलं आहे. दरम्यान, काही नकरात्मक कमेंट्स करणारे नेटकरी सोडता अनेकांनी त्याच्या या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी शेती कामात आजीबाईंना मदत करत असल्यामुळे त्याचे कौतुकही केले आहे