बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे झालेल्या हल्ल्याने अवघ्या मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. यावेळी सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले. यापैकी तीन वार हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे होते. मात्र, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. लिलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. तो देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला असून सध्या सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. याबद्दल अनेक मोठे खुलसे होत असताना आता आणखी मोठी माहिती समोर आली आहे. (rickshaw driver on saif ali khan attack)
सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणाचा आरोपी कोण आहे? याविषयी पोलिस तपास करत आहेत. अशातच आता सैफला रिक्षाने लीलावती हॉस्पिटलला नेणारा ऑटोवाला समोर आला आहे. याबद्दल त्याने असं म्हटलं आहे की, “मी जात होतो, तेव्हा दूरवरून एक महिला येत होती, तिने रिक्षा-रिक्षा अशी हाक मारली. त्यामुळे मी पण घाबरलो होतो. तेवढ्यात गेटमधूनही आवाज आला. म्हणून मग मी यू-टर्न घेऊन गेटकडे गेलो आणि गाडी तिथेच उभी केली. सैफच्या पाठीला रक्त लागले होते, रक्त वाहत असल्याने मला खूपच वाईट वाटले, माझ्या रिक्षात सैफ अली खान बसला आहे, याची मला कल्पना नव्हती. कुणीतरी दुखापतग्रस्त व्यक्ती बसलेला असेल, असं मला वाटलं.
यापुढे त्याने असं सांगितलं की, “लीलावती रुग्णालयात गेल्यानंतर रिक्षातून ज्यावेळी सैफ आणि त्याचा मुलगा खाली उतरला, त्यावेळी रिक्षात स्टार अभिनेता बसला होता, हे मला कळलं. माझी रिक्षा इमर्जन्सी गेटमध्ये गेली. तेथील रुग्णवाहिका लगोलग हटविण्यात आली. परिस्थिती पाहून रुग्णालयातील कर्मचारी तातडीने रिक्षाकडे धावले. तोपर्यंत त्यांनाही सैफ अली खान असल्याचे कळाले होते. त्याच्या पाठीतून चांगलेच रक्त वाहत होते”.
दरम्यान, काल (गुरुवार १६ जानेवारी) रोजी करिनाच्या टीम कडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. ज्यात सैफ अली खामवर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. काही शस्त्रक्रियानंतर आता सैफवरील धोका टळला आहे. तसंच या प्रकरणी एक व्यक्ती ही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.