अभिनेत्री तेजश्री प्रधानने स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ अचानक सोडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता तेजश्रीच्या जागी ‘मुक्ता कोळी’ या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसणार आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या स्वरदाचा ‘प्रेमाची गोष्ट’मधील एन्ट्रीचा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या १७ जानेवारीपासून म्हणजेच आजपासून मालिकेत तिची नवीन एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांमधील सर्व जोड्यांनी एकत्र येत मकर संक्रात साजरी केली. त्यानिमित्ताने स्वरदा पहिल्यांदाच मुक्ताच्या रुपात पाहायला मिळाली. त्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Apurva Nemalekar welcomed Swarda Thigale)
अशातच आता या मालिकेतील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेही या नवीन मुक्ताचे म्हणजेच स्वरदा ठिगळेचे स्वागत केले आहे. अपूर्वाने स्वरदासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे आणि तिचं या मालिकेत स्वागत केलं आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वरदाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “प्रत्येक गोष्टीचा नवीन अध्याय हा नेहमीच नवीन सुरुवात घेऊन येतो. मुक्ताच्या भूमिकेत स्वरदाचे स्वागत करण्यासाठी आमच्यात सामील व्हा”.

आणखी वाचा – सैफ अली खानच्या लहान मुलावर हल्ला करण्याचा होता प्रयत्न, मागितलेले एक कोटी, कर्मचारीचा धक्कादायक खुलासा
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मालिकेची कथासुद्धा नव्या ऊर्जेने आणि ताज्या दृष्टिकोनाने पुढे चालू राहत आहे. स्वरदाचे आमच्या कुटुंबात मनःपूर्वक स्वागत”. तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. स्वरदाने सेटवरचा पहिला फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला होता. “नवीन वर्ष, नवीन सुरुवात” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
दरम्यान ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीमध्ये स्वरदाने असं म्हटलं होतं की, “मालिकेच्या सेटवर येऊन मला तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे आता मी या भूमिकेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मला माझ्याबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यामुळे या सर्व पद्धतीचा सध्या मी आनंद घेत आहे”. दरम्यान, आता स्वरदा तेजश्रीची जागा घेऊन तिच्यासारखंच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का? यामध्ये तिला कितपत यश मिळेल? हे आगामी दिवसांत पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.