Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस’चे घर हे भांडण, वाद-विवाद, मतभेद यांसाठी जितकं चर्चेत असतं तितकंच ते घरातील सदस्यांच्या भावभावनांसाठीही ओळखलं जातं. घरात आलेले सदस्य हे त्यांच्या खऱ्या कुटुंबापासून लांब आल्यामुळे ते ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांना आपलं कुटुंब बनवतात आणि वेळ प्रसंगी त्यांना आपली सुखदुःख, भावना शेअर करतात. असंच ‘छोटा पुढारी’ म्हणजेच घन:श्याम दरवडेने धनंजय पोवारकडे त्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल पहिलं कॅप्टनसीचं कार्य पार पडलं. यावेळी गेम अनफेअर झाला त्यामुळे घन:श्यामला रडू कोसळले. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
पहिल्या कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं. या टास्कमध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर ही विजयी झाली आणि ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. तर घन:श्यामला खूप वाईट वाटतं. अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतात. तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो.
यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘छोटा पुढारी’ धनंजयकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटतं आणि तो रडू लागतो. यावेळेस घन:श्याम धनंजयकडे असं म्हणतो की, “माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये कसा गेला?”.
यावर धनंजय घन:श्यामला समजावत असं म्हणतो की,”शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय माफता येणार?” घन:श्यामचा हा नवीन प्रोमो खूपच भावुक आहे. दरम्यान, अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? हे आगामी भागांत पाहावे लागेल.