Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरु झाला असून स्पर्धक मंडळी ट्रॉफीसाठीच्या लढाईत जम धरु लागली आहेत. स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सध्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, संग्राम चौघुले हे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. नुकताच आठव्या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार यांत स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या आठवड्यात मात्र एकदा झालेल्या कॅप्टन पदाच्या स्पर्धकाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
आठव्या आठवड्याचा कॅप्टन होण्याचा बहुमान अरबाज पटेलला मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात दोन वेळा कॅप्टन बनण्याची संधी अरबाजला मिळाली आहे. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ या कॅप्टन्सी कार्यांतर्गत अरबाज पटेल हा कॅप्टन पदाचा मानकरी ठरला. कॅप्टन्सीसाठी वर्षा, सूरज, अरबाज व धनंजय असे चार दावेदार होते. या सदस्यांच्या समोर ‘बिग बॉस’ने पाण्याने भरलेले डबे ठेवले होते. अंकिता, पॅडी, निक्की व जान्हवी या चार सदस्यांना पळत जाऊन बझर वाजवायचा होता. जो सदस्य आधी बझर वाजवणार तो एक ग्लास पाण्याचे दर ठरवणार होता आणि कार्याच्या अंतिम फेरीत ज्याच्याकडे सर्वाधिक बीबी करन्सी असेल तो सदस्य विजयी होणार होता.
पहिल्या डावातच निक्कीने बझर वाजवून संपूर्ण गेम फिरवला. दुसऱ्या डावात सुद्धा निक्कीनेच बझर वाजवला. त्यामुळे अर्थात अरबाजच्या वाट्याला अधिक करन्सी आली. दरम्यान, वर्षा यांनी टीम ए सह हातमिळवणी केल्याने याचा कॅप्टन्सी टास्कवर परिणाम झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शिवाय जान्हवीनेही धनंजयला बाद करत वर्षा यांना पुढे आणलं. आणि वर्षा व अरबाज यांच्यात अखेरचा डाव सुरु झाला आणि ही लढाई अरबाज जिंकला. अरबाज पटेल पुन्हा एकदा या घराचा कॅप्टन झाला. आपला मित्र पुन्हा एकदा कॅप्टन झाल्याने निक्कीला प्रचंड आनंद झाला होता.
“‘बिग बॉस’ला याला सेफ करायच होत नाही तर हा या आठवड्यात १००% बाहेर पडला असता”, “काय उपयोग नाही अरबाजचा कॅप्टन बनुन. खरी कॅप्टन तर निक्की झाली आहे. कारण अरबाज सगळं तिचंच ऐकणार आणि शेपूट बनुन राहणार”, “पुन्हा सिद्ध झाले निक्की व जान्हवीमुळे अरबाज कॅप्टन झाला”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत अरबाजच्या कॅप्टन्सीला नापसंती दर्शविली आहे.