Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाचे हे पर्व १०० दिवसांवरुन ७० दिवसांवर आले, याची ‘बिग बॉस’ यांनी अधिकृतरीत्या घोषणा केली. आता ‘बिग बॉस’च्या घरात सात स्पर्धक उरले आहेत. या सात स्पर्धकांपैकी एक स्पर्धक विजेतेपदावर नाव कोरणार आहे. तर या आठवड्यात मीड वीक एविक्शन पार पडणार आहे. त्यामुळे या सात सदस्यांपैकी कोणाची अंतिम फेरीत जाण्याची संधी हुकतेय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या पर्वाची पहिली ग्रँड फायनलिस्ट निक्की तांबोळी ठरली.
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर व वर्षा उसगांवकर हे स्पर्धक आता ‘बिग बॉस’च्या घरात उरले आहेत. नॉमिनेट होण्यापासून वाचण्यासाठी आता स्पर्धकांचे नातेवाईक, चाहते, कुटुंबीय त्यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. शिवाय ते प्रेक्षकांना भरभरुन वोट करण्याची विनंती करतानाही दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील अभिजीत सावंतच्या आई व सासू बाईंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिजीत सावंतच्या सोशल मीडियावर त्याच्या आई व सासूबाईंचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अभिजीतची आई असं म्हणताना दिसत आहे की, “माझा मुलगा जसा माझा आहे, तसाच तो महाराष्ट्राचा पण आहे. ‘इंडियन आयडल’च्या वेळी महाराष्ट्राने जसं त्याला भरभरुन प्रेम दिलं, त्याला आपुलकी दिली आणि त्याला जिंकवून आणलं. त्याच प्रमाणे तो आता ‘बिग बॉस’मध्ये आहे. त्यामुळे तुमचा मुलगा समजून त्याला मत करुन जिंकून आणा”.
याच व्हिडीओमध्ये अभिजीतच्या सासूबाई म्हणाल्या की, “एवढी २० वर्ष तुम्ही जे अभिजीतला प्रेम दिलंय, ते आताही द्या. आम्ही जसं त्याला मत करतोय तसं तुम्ही देखील द्या. आमच्या अभिजीतला मत द्या”. आई व सासूबाईंचा व्हिडीओ अभिजीतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “माझ्या दोन्ही आईंना धन्यवाद. देवाने मला दोन इतक्या प्रेम व पाठिंबा देणाऱ्या आई दिल्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर असू दे”.