Bigg Boss Marathi Season 5 : बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा सुपरस्टार रितेश देशमुख यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारताना दिसला. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर धमाल-मस्ती पाहायला मिळाली. भाऊच्या धक्क्यावर रितेशने स्पर्धकांची चांगलीच शाळाही घेतली. तर चुका केलेल्या स्पर्धकांना त्याने चांगलंच धारेवर धरलं. एकूणच प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रेक्षक मंडळी रितेशच्या भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून भाऊच्या धक्क्याला सुद्धा ब्रेक लागला असल्याचं पाहायला मिळालं.
गेले दोन आठवडे भाऊचा धक्का हा झालेला नाही. रितेश हा कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊचा धक्का पार पडलेला नाही. पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याऐवजी घरात पत्रकार परिषद पार पडली. तर, दुसऱ्या आठवड्यात घरात राखी सावंत, अनिल थत्ते, अभिजीत बिचुकले या खास पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर ‘बिग बॉस’चा विकेंड स्पेशल भाग डॉ. निलेश साबळे होस्ट करताना दिसला. रितेश देशमुखच्या अनुपस्थितीमुळे अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. महेश मांजरेकरांच्या जागी रितेश देशमुख आला तेव्हाच काहींना हे खटकलं. यावरुन अनेकांनी रितेश देशमुखला ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं. तर त्यांनतर रितेशने स्पर्धकांची हवी तशी शाळा घेतली नाही म्हणून त्याला अनेकांनी खडसावले.
यानंतर दोन आठवडे रितेश भाऊच्या धक्क्यावरही दिसला नाही, त्यामुळे त्याने हा शो सोडला की काय असा अंदाज अनेकांनी लावला. अशातच गेल्या आठवड्यात स्वत: ‘बिग बॉस’ने “रितेश कामानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यामुळे ते थेट ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहतील” असं सांगितलं. रितेश शूटिंगनिमित्त गेल्या काही दिवसांपासून परदेशात होता. त्यानंतर त्याचे कुटुंब त्याला भेटण्यासाठी परदेशात पोहोचले. तब्बल २० दिवसांनी जिनिलिया व तिची दोन्ही मूळ रितेशला भेटली. यानंतर तो कुटुंबासह परदेशात वेळ घालवताना दिसला. इतकंच नव्हे तर त्यांनी कुटुंबीयांसह एकत्र लाइव्ह मॅच पाहण्याचा आनंद घेतला. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 : ‘तारक मेहता…’ फेम सोढीची ‘बिग बॉस १८’मध्ये एंट्री, तर व्हायरल भाभीच्याही नावाची होतेय चर्चा
“भाऊचा धोका”, “पळकुट्या होस्ट. झेपत नव्हतं तर कशाला घेतली जबाबदारी. एखाद्या पात्र असलेल्या सूत्रसंचालकाची जागा घेतली. शो वाऱ्यावर सोडून गेला”, “हा सुद्धा याच्या मतावर ठाम नाही. एवढीच ट्रोलिंगची भीती होती तर का आला?”, “तुम्ही हा शो कसा सोडू शकता. निराशा”, “बिग बॉस सोडून कुठे फिरताय?”, “शनिवार-रविवार मजा नाही येत”, “तुम्ही फिरत आहात आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर तुमची वाट बघतो”, “तुम्ही बिग बॉस मराठी सोडून खूप लोकांची मनं दुखावली आहेत”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेशला ट्रोल केलं आहे. 6 ऑक्टोबरला होणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला रितेश देशमुख हजर राहणार असल्याचं समोर आलं आहे. या महाअंतिम सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी तो पार पडणार आहे.