‘वैजू नं. १’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिका व ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. सोनालीने या सर्व मालिकांमध्ये उत्तम काम करत प्रेक्षकांना आपलंसं केलं. तसेच, ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली, ज्यात तिने उत्कृष्ट खेळ दाखवत सर्वांची मने जिंकली. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. शिवाय, तिच्या म्युझिक अल्बमची अनेकदा चर्चा होत असते. अभिनयासह सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहते. ती तिच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यातील अनेक फोटोज व व्हिडीओजची बरीच चर्चा होते. असाच एक व्हिडीओ नुकतंच तिने शेअर केला, जो चांगलाच व्हायरल होत आहे. (Sonali Patil share a post for her Grandmother)
सोनाली सध्या दिवाळीनिमित्त तिच्या गावी असून तिने यावेळी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्या जवळची एक व्यक्ती असल्याचं पाहायला मिळत आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून तिची आजी आहे. सोनालीने तिच्या आजीसह एक रील पोस्ट केली, ज्यात तिच्या आजीसाठी खास पोस्टदेखील शेअर केली.
शेअर केलेल्या रीलला कॅप्शन देताना ती असं लिहिते, “तर ही आहे माझी आजी, आईची आई. तिला आम्ही सगळे प्रेमाने “आऊ” म्हणतो. तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा आणि तिच्या अनुभवांचा माझ्यासाठी, माझं आयुष्य जगण्यासाठी आणि ते सोपं करण्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे. कारण ती आजही प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक गोष्टीतून नवीन काहीतरी शिकवत असते. आणि मला ते सगळं तिचं ऐकायचं असतं आणि आत्मसात करून माझ्या आयुष्यामध्ये उतरवायचा असतं. हे असं एका शब्दात नाही सांगता येणार, पण तिची ‘दुनियादारी’, तिचा प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही औरच आहे. कदाचित जर मी तिला ऐकलं नसतं, तर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळाच असता.”
हे देखील वाचा – ‘मुलगी झाली हो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह करत मारला फेरफटका
पुढे ती असं म्हणते, “पण आता मी जशी काय आहे ते तिच्यामुळे. तिच्या संस्कारांमध्ये वाढले. आपण इतरांसाठी त्यांच्या सुखासाठी कसं जगलं पाहिजे, आपल्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या हास्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असं हे सगळं मी तिच्याकडून शिकले. ती सारखी म्हणते, अगं लहान बाळ असलं तरी त्याचं ऐकायचं. कारण ते सुद्धा आपल्याला जे सांगत असता, त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणून निदान त्याचं ऐकून तरी घ्यायचं आणि यातून नक्कीच आपल्याला काहीतरी सापडतात. अशा बऱ्याच गोष्टी आणि तिचे बरेच फंडे मी ऐकत असते आणि फॉलो पण करत असते, बरं का.”
हे देखील वाचा – नव्या घरात प्रसाद खांडेकरची कुटुंबिय-मित्रपरिवारासह जल्लोषात दिवाळी, म्हणाला, “गाठीभेटी…”
“तर अशी ही माझी आऊ, तिच्याबरोबर मी हा रील केला खरा. पण तिला खोटं सांगून केला की, हा व्हिडिओ फक्त आपल्या दोघींच्यासाठी आहे. पण आता तुम्हा सगळ्यांना सांगते. हे आपल्यातलं हे सिक्रेट आपल्यातच राहू दे बरं का!”, असं सोनाली या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेम देत आहे. तसेच एका नेटकऱ्याने “नशीबवान आहात तुम्ही, ऐकायलाच लागतं. या जेष्ठ पिढीबरोबर जगायला मिळते हेच पुण्याईचे आहे. आजींना साष्टांग नमस्कार”, अशी कमेंट करत अभिनेत्रीच्या आजीचे कौतुक केले. याआधीही सोनालीने तिच्या आजीची एक पोस्ट केली होती, त्याची देखील बरीच चर्चा झाली होती.