६ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झालेला ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. उद्या, १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक पोलच्या माध्यमातून कोण विजयी होणार? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोणी विवियन डिसेना जिंकणार म्हणत आहे, तर कोणी करणवीर मेहरा जिंकणार म्हणत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाविजेता नेमका कोणता सदस्य होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजत दलाल या सहा जणांमधून एकजण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होणार आहे. (bigg boss 18 finale updates)
‘बिग बॉस १८’ चा महाअंतिम सोहळा उद्या १९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता सुरु होईल, कलर्स चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर हा सोहळा पाहता येणार आहे. ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचा जो कोणी विजेता असेल त्याला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळेल. याशिवाय विजेत्याला मोठी रक्कमही बक्षीस म्हणून किलणार आहे. बक्षीस म्हणून विजेत्याला नक्की किती रक्कम मिळेल? शिवाय इतर काय मिळणार? याविषयी जाणून घेऊया.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शोसाठी आतापर्यंत जी विजेती रक्कम सांगितली जात आहे ती जवळपास ५० लाख रुपये असू शकते. मात्र, ‘बिग बॉस’कडून यंदाच्या पर्वासाठी काही बदल केले गेले असतील. तर या रक्कमेत वाढ होऊ शकते किंवा ही रक्कम कमीही होऊ शकते असं म्हटलं जात आहे. आत्तापर्यंत ‘बिग बॉस १८’चे विजेते म्हणून रजत दलाल आणि विवियन डिसेना यांची नावे समोर येत आहेत, ते दोघेही ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचे दावेदार मानले जात होते.
आणखी वाचा – “मला तो समलिंगी वाटला होता”, फराह खानचं नवऱ्याबद्दल मोठं भाष्य, म्हणाली, “२० वर्षांत कधीही…”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘मिड वीक एविक्शन’ पार पडलं. यावेळी शिल्पा शिरोडकर घराबाहेर झाली. आता ‘बिग बॉस’च्या घरात विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजत दलाल हे सहा सदस्य आहेत. या सहा जणांमधून कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीचा हक्कदार होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.